⚡सावंतवाडी,ता.१५-: विश्वविख्यात अभियंते, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस, अर्थात ‘अभियंता दिन’, आज येथील पाटबंधारे उपविभागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १०२ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या सर विश्वेश्वरय्या यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाला उजाळा देण्यात आला.
यावेळी पाटबंधारे उपविभागीय अधिकारी श्री. महेंद्र डांबरेकर यांच्या हस्ते सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना श्री. डांबरेकर यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचे विश्लेषण केले. ते म्हणाले, “विश्वेश्वरय्या यांनी आपल्या ज्ञान आणि कौशल्याने अभियांत्रिकी क्षेत्रात क्रांती घडवली. त्यांनी देशातील नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून अनेक रचनात्मक आणि दूरदृष्टीच्या योजना राबवल्या. केवळ धरणेच नव्हे, तर शेती विकासासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण प्रकल्प उभारले आणि अल्पकाळात भरपूर उत्पादन मिळवून देणाऱ्या खतांवरही संशोधन केले. त्यांचे कार्य आजच्या तरुण अभियंत्यांसाठी प्रेरणास्थान आहे.”
या कार्यक्रमाला शाखा अभियंता श्री. मधुसूदन दुबळे, कनिष्ठ अभियंता श्री. महेश आंदुर्लेकर, श्री. शैलेश परब, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्री. राहुल जोशी, लिपिक श्री. विनय वेंगुर्लेकर, श्री. सुशील सुर्वे तसेच श्रीमती पार्वती कांबळे यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
