वेंगुर्ला आगाराच्या मनमानीला केटीसीएलचे उत्तर…

मळेवाड उपसरपंचांनी मानले आभार..

⚡सावंतवाडी ता.१४: वेंगुर्ला आगारातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक प्रवाशांना, विशेषतः विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि त्या पार्श्वभूमीवर गोवा कदंबा वाहतूक महामंडळाने (केटीसीएल) सुरू केलेल्या अतिरिक्त बससेवेमुळे मळेवाडचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी केटीसीएलचे आभार मानले आहेत. तसेच, वेंगुर्ला आगाराच्या ढिसाळ नियोजनावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वेंगुर्ला-सातार्डा बस फेरीच्या अनियोजित बंदमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत होते. या समस्येची दखल न घेतल्यास वेंगुर्ला आगाराची एकही बस मळेवाड गावातून जाऊ देणार नाही, असा इशारा उपसरपंच मराठे यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर आणि प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेत गोवा केटीसीएलने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी “वास्को ते वेंगुर्ला” आणि “पणजी ते वेंगुर्ला” या दोन अतिरिक्त बससेवा मळेवाड मार्गे सुरू करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाचे स्वागत करताना श्री. मराठे म्हणाले की, “प्रवाशांची मागणी आणि गरज ओळखून कदंबाने तातडीने बससेवा सुरू केली, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आपल्याच राज्यातील एसटी महामंडळाला प्रवाशांची सोय बघता आली नाही, हे दुर्दैव आहे. वेंगुर्ला आगाराने यातून बोध घ्यावा.” या नवीन बससेवेमुळे परिसरातील सर्व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मळेवाड ग्रामस्थांच्या वतीने या नवीन कदंबा बससेवेचे स्वागत करण्यात येणार असल्याचेही श्री. मराठे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page