धोंडू चिंदरकर:मालवण तालुक्यात सेवा पंधरावडा राबविणार..
⚡मालवण ता.१३-:
मालवण तालुक्यातील आगामी काळात होणाऱ्या निवडणुका भाजपने स्वबळावर लढविण्याचा निर्धार तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे, निवडणुकीत शतप्रतिशत भाजप होण्याच्या दृष्टीने आणि भाजप पक्ष संघटनेला ताकद देण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्व:बळाचा निर्धार केल्याची माहिती भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मालवण येथील हॉटेल महाराजा येथे मालवण तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर, सुदेश आचरेकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, पंकज सादये, मंदार केणी, भाई कासवकर, जीवन भोगावकर, महेंद्र चव्हाण, मनोज मेथर, सचिन आंबेरकर, पंकज पेडणेकर, रवींद्र टेंबुलकर, प्रमोद करलकर, रोहन पेंडूरकर, पूजा करलकर, अन्वेषा आचरेकर, महिमा मयेकर, सेजल परब, वैष्णवी मोंडकर, दीक्षा गावकर, अमिता निवेकर, समीक्षा खोबरेकर, रश्मी लुडबे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी धोंडू चिंदरकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मालवण तालुक्यात होणाऱ्या सेवा पंधरवड्याचे नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले. तालुक्यात एकूण १२ पंचायत समिती गणांमध्ये सभा घेतल्या जाणार आहेत. यात १४ सप्टेंबर रोजी पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील दोन पंचायत समिती गणांमधून या सभेची सुरुवात होईल. २० सप्टेंबर रोजी मालवण शहरात या सेवा पंधरवड्याची सांगता होणार आहे. या सेवा पंधरवड्यात भाजप कार्यकर्ते वृक्षारोपण आणि दिव्यांग बांधवांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. तसेच, केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाईल असे श्री. चिंदरकर यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार सेवा पंधरवड्या दरम्यान भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. घटस्थापनेच्या दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे मालवणचा दौरा करतील. या दौऱ्यात ते जनता दरबार घेऊन नागरिक आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतील. या दौऱ्यात ते विकासात्मक कामांचा आढावा घेण्यासोबतच तालुक्यात नवीन उद्योग आणण्यासाठीच्या शक्यतांवरही चर्चा करतील, असेही चिंदरकर यांनी सांगितले.
तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत भाजपने स्व:बळावर निवडणूक लढवावी अशी इच्छा भाजपचे सरपंच, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष व कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात आली आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत, युती करून निवडणूक लढविल्यास काही इच्छुक कार्यकर्त्यांना निवडणूक लढविता येत येत नाही. त्यामुळे भाजपने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, स्व:बळावर लढल्यास पक्ष संघटनेलाही ताकद मिळणार आहे, असे कार्यकर्त्यांचे मत असल्याचेही धोंडू चिंदरकर म्हणाले.
