सभापती शर्वाणी गांवकर यांच्या अध्यक्षतेखालील सभेत मान्यता
सिंधुदुर्गनगरी ता ०६ जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या सन २०२१-२२ साठी जिल्हा परिषद १० टक्के सेस मधून ६६ लाख २५ हजार २०० रुपयांच्या कृती आराखड्याला आजच्या महिला व बालकल्याण समिती सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समितीची सभा सभापती शर्वाणी गावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा महिला व बालकल्याण अधिकारी अमोल पाटील, समिती सदस्या श्वेता कोरगावकर , राजलक्ष्मी डिचवलकर, संपदा देसाई, पल्लवी राऊळ आदीसह तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी सहभागी झाले होते. आजच्या महिला व बालकल्याण समिती सभेत सन २०२१-२२ साठी जिल्हा परिषद १० टक्के सेस कृती आराखडा मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या आराखड्यानुसार चर्चा होऊन महिलांसाठी प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजनांमध्ये गांडूळ खत प्रशिक्षण व रोपवाटिका प्रशिक्षण देणे या दोन्ही नवीन योजनांचा समावेश करत सन २०२१-२२ साठी विविध योजनांसाठी ६६ लाख २५ हजार २०० रुपयांची तरतूद असलेल्या कृती आराखड्याला आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली. महिला व बालविकास विभागाकडील अंगणवाडी सेविका , मदतनीस , मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून या भरती प्रक्रियेबाबत ७ हरकती प्राप्त झाल्या असून या हरकतीवर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनावणी घेणार आहेत. मात्र सद्यस्थितीत कोरोना महामारीचे संकट असल्याने ही सुनावणी २५ मे नंतर घेण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६२ तीव्र कमी वजनाची बालके – सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५८७ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यामध्ये ० ते ६ वयाेगटातील ३९९६० एवढी बालके आहेत . त्यापैकी ३९८५७ बालकांचे वजन घेतले असता त्यामध्ये ३९०९६ एवढी बालके सर्वसाधारण वजनाची आहेत. तर ६९९ बालके कमी वजनाची व ६१ बालके तीव्र कमी वजनाची असल्याची माहिती आजच्या सभेत देण्यात आली. स्वत:ची इमारत नसलेल्या ४६१ अंगणवाड्या – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यरत १५८७ अंगणवाड्यांमध्ये स्वत:च्या मालकीच्या इमारत असलेल्या ११२६ एवढ्या अंगणवाड्या असून खाजगी इमारतीत १६९ अंगणवाड्या, प्राथमिक शाळा इमारतीत २२१ अंगणवाड्या, तर सार्वजनिक ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या ७१ अंगणवाड्या आहेत. अशा प्रकारे स्वत:ची इमारत नसलेल्या ४६१ एवढ्या अंगणवाड्या असल्याची माहिती सभेत देण्यात आली. तर स्वत:ची जागा नसलेल्या अंगणवाड्यांसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश सभापती शर्वाणी गावकर यांनी दिले.
