कोरजाई बसच्या उशिरावरून ठाकरे सेना आक्रमक..
कुडाळ : कुडाळ ते कोरजाई ही बस सेवा कित्येक वर्षे सुरू आहे. पुरेसे प्रवाशी असलेली ही बस कुडाळ वरुन सायंकाळी ६ .४० वा न सुटता नेहमीच उशिराने सुटते. येत्या दोन दिवसांत बस वेळेवर न सुटल्यास कवठी येथुन एकही बस कुडाळ येथे येऊ देणार नाही, असा इशारा कवठी उपसरपंच सौ. ऋतुजा खडपकर यांच्यासह उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कुडाळ आगार व्यवस्थापक रोहीत नाईक यांना देण्यात आला आहे.
कुडाळ ते कवठी कोरजाई ही बससेवा सायंकाळी ६.४० वा कुडाळ बसस्थानकावरुन सुटण्याची वेळ असताना ही बस कधीही वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यासाठी आज उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, नेरुर जि प विभाग उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, उपसरपंच सौ रुतुजा खडपकर, माजी सरपंच रुपेश खडपकर, शाखाप्रमुख राजन खोबरेकर, युवासेनेचे रुपेश खडपकर यांनी कुडाळ आगार व्यवस्थापक रोहीत नाईक यांची भेट घेऊन ही बस सेवा वेळेवर सोडण्यासाठी निवेदन सादर केले आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी सांगितले कि, कुडाळ आगाराचे वेळापत्रक पुर्णपणे कोलमडले असुन सुरक्षित बस सेवा यापुर्वी दोन वर्षे आधी मिळत होती. परंतु सध्या गावागावात जाणाऱ्या काही बसेस बंद करुन प्रवाशांची गैरसोय केलेली आहे. ज्या बसेस बंद केलेल्या आहेत, त्या पुर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी श्री सावंत यांनी केली आहे.