कुडाळ : एस.के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस.एल. देसाई आणि कै.सौ. सिताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालयात कै. सिताबाई रामचंद्र परब स्मृतिदिन अत्यंत श्रद्धा, उत्साह व औपचारिकतेने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात कै. सिताबाई परब यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या कार्यतत्परतेचा व कुटुंबीयांनी दाखविलेल्या समाजाभिमुख भूमिकेचा गौरव केला. विशेषत: शिक्षण क्षेत्रातील योगदानाची गरज अधोरेखित करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी या स्मृतिदिनातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक संस्थांनी नेहमीच पुढाकार घ्यावा यावर भर दिला. तंत्रज्ञानाच्या युगात आयटी शिक्षण ही काळाची गरज आहे आणि अशा सुविधा ग्रामीण स्तरावर उपलब्ध करून देणे ही अत्यंत समाधानाची बाब आहे, असेही त्यांनीसांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आयटी विषयाचे अद्ययावत ज्ञान मिळावे, तंत्रज्ञानाशी सुसंगत प्रगती साधता यावी या उदात्त हेतूने कै.अंकुश परब यांनी आपल्या मातोश्री कै. सिताबाई रामचंद्र परब यांच्या स्मरणार्थ महाविद्यालयाला देणगी दिली. या देणगीतून महाविद्यालयात सुसज्ज आयटी लॅब उभारण्यात आली आहे. आधुनिक संगणक, प्रोजेक्टर व इंटरनेटसह ही लॅब विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे दालन ठरली असून सध्या शेकडो विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी ही सुविधा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयटी शिक्षक कासकर सर यांनी केले. आभार प्रदर्शन देसाई सर यांनी केले.
कै. सिताबाई रामचंद्र परब स्मृतिदिन पाट महाविद्यालयात उत्साहात साजरा…
