राज्य शासनाचा निर्णय ; मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार:सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या माध्यमातून शासकीय वसतिगृह मंजुर..
⚡मालवण ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सिंधुदुर्गनगरी आणि कुडाळ येथे नवीन शासकीय वसतिगृहे उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आमदार निलेश राणे यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निवास आणि भोजनाच्या सोयी-सुविधांची कमतरता जाणवत होती. यामुळे अनेक हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी १३ ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय मंत्र्यांना पत्र सादर करून या ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरू करण्याची विनंती केली होती.
मंत्रालयाने आमदार राणे यांच्या पत्राची दखल घेत ही मागणी योग्य असल्याचे नमूद केले. नव्या वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, पौष्टिक भोजन, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध होईल. यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होईल आणि सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असे पत्रात म्हटले आहे.
या मंजूरीमुळे सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच सुरुवात होणार आहे असेही मंजुरीच्या पत्रात म्हटले आहे.