सत्यवान रेडकर यांचे कुडाळ आणि देवगडमध्ये निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन…

कुडाळ-बाव येथे १ सप्टेंबरला तर देवगड-मोंड येथे ३ सप्टेंबरला मार्गदर्शन..

कुडाळ : ‘तिमिरातूनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, सत्यवान यशवंत रेडकर यांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कुडाळ तालुक्यात बाव आणि देवगड तालुक्यात मोंड येथे आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षण प्रेमींनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक व प्रमुख वक्ता सत्यवान रेडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याचे भूमिपुत्र असून उच्चविद्याविभूषित केंद्र शासनाचे अधिकारी आहे. ‘तिमिरातूनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीचे ते प्रणेते आहेत. इच्छूक आणि गरजू मुलांना ते मोफत शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करीत असतात. सोमवार दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता, बांव ग्रामोन्नती मंडळ, मुंबई यांच्या मार्फत जि.प.पू.प्रा. शाळा बांव, ता. कुडाळ येथे हे मार्गदर्शन व्याख्यान होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग प्रबोधिनी मार्फत बुधवार दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता, शांताराम विष्णू कुलकर्णी माध्यमिक विद्यामंदिर मोंड, ता. देवगड येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे‌. सत्यवान रेडकर यांनी आतापर्यंत ३५८ निःशुल्क मार्गदर्शनपर व्याख्याने दिली असून बाव येथील ३५९ वे तर मोंड येथील ३६० निःशुल्क मार्गदर्शन असणार आहे.
उत्सवाची धामधुम असली तरी येथील विद्यार्थ्यांनी कोकण बोर्डच्या गुणपत्रिकेतील टक्केवारी व बोर्डात अव्वल स्थानावर मर्यादित न राहता राज्य/केंद्र शासन/बॅंका आदी विभागात प्रशासकीय पदांवर हवे आहेत. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षण प्रेमींनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क नसून फक्त वही व पेन सोबत असू द्यावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page