शामसुंदर धुरी, साईप्रसाद कल्याणकर यांनी दिली आंदोलनाची हाक:आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही, तर बांदा शहरातील जनतेच्या विकासासाठी..
⚡बांदा ता.२९-: मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका ते बांदा- पत्रादेवी या मार्गावरील ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांच्या दुरुस्तीसाठी आणि बांदा ब्रिजवरील बंद असलेल्या विद्युत दिव्यांसाठी येत्या ४ सप्टेंबर रोजी टोल नाक्यानजीक पडलेल्या खड्ड्यांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी, साईप्रसाद कल्याणकर यांनी या आंदोलनाची हाक दिली असून, सर्वांनी एकजुटीने यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. हे आंदोलन ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता 'रस्ता रोको' पद्धतीने करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश पत्रादेवी ते खामदेव नाका या रस्त्यावरील खड्डे बुजवणे आणि बांदा ब्रिजवरील बंद दिवे पूर्ववत सुरू करणे हा आहे.
श्री धुरी यांनी सांगितले की, हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही, तर बांदा शहरातील जनतेने बांद्याच्या विकासासाठी एकत्र येऊन आयोजित केले आहे. या आंदोलनातून बांद्याच्या जनतेची एकजूट दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.