सातार्डा येथे गणेशोत्सवात वीजपुरवठा कमी दाबाचा,गणेशभक्तांचे हाल…

⚡सावंतवाडी ता.२९-:
गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणातही सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा, तरचावाडा आणि केरकरवाडा येथील रहिवाशांना वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसला आहे. या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होणे आणि कमी दाबाने येणे यामुळे नागरिकांना, विशेषतः गणेशभक्तांना, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री बुधवारी 27 ऑगस्ट ला सातार्डा,साटेली आणि मळेवाड भागासह वीज खंडित झाली. तब्बल १५ तासांनी, म्हणजेच दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला, मात्र तो कमी दाबानेच येत असल्याने पिण्याच्या पाण्याचे पंप चालू होऊ शकले नाहीत. यामुळे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मुसळधार पाऊस सुरू असतानाही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या समस्येचे मूळ कारण जिवंत वीजवाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा स्पर्श असल्याचे सांगितले जात आहे. आमदार दीपक केसरकर यांनी गणेशोत्सवापूर्वी अखंडित वीजपुरवठा राखण्यासाठी वीजमहावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक साहित्य आणि वाहने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वखर्चाने मदत करण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. गणेशोत्सवापूर्वी वीजवाहिन्यांची तपासणी आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे आवश्यक असतानाही हे काम झाले नाही, ज्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या महावितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निष्काळजीपणामुळे गणेशभक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

You cannot copy content of this page