नियमाचे पालन करून डी जे लावा…

पोलीस अधीक्षक डॉ दहिकर:मालवण तहसीलदारांनी घातलेल्या बंदी विरोधात व्यावसायिकांनी घेतली भेट

⚡ओरोस ता २५-: शासनाचे नियम पाळून व्यवसाय करत असताना मालवण तहसीलदार यांनी मालवण तालुक्यातील डीजे व्यवसायाला पूर्णतः बंदी घातली आहे. याबाबत मालवण सह जिल्ह्यातील सर्व डी जे व्यावसायिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांचे याकडे लक्ष वेधले. दरम्यान शासनाच्या नियमानुसार आवाज मर्यादेचे पालन करून डी जे व्यवसाय करण्यास कोणतेही बंधन नसल्याची ग्वाही पोलीस अधीक्षकानी दिली असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मालवण तालुक्याच्या शांतता समितीच्या बैठकीत मालवण तहसीलदार यांनी डी जे लावण्यास मालवण तालुक्यात पूर्णतः बंदी असल्याचे आदेश दिले. तसेच गणेशोत्सव कालावधीत डी जे लावल्यास कारवाई करण्याचे संकेत दिले. याबाबत आज मालवण तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी जे व्यावसायिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांची भेट घेत आपली कैफियत मांडली. यावेळी कर्ज काढून डी जे व्यवसाय सुरू केला आहे. मात्र पूर्णतः बंदी घातल्यास कर्जबाजारी होण्याची वेळ या व्यावसायिकांवर येणार आहे. शिवाय जिल्ह्यातील आठ पैकी एका तालुक्यात डी जे वर बंदी आणि अन्य तालुक्यात नाही याकडेही पोलीस अधीक्षक यांचे लक्ष वेधण्यात आले.
दरम्यान गणेशोत्सव कालावधीत शांतता राखण्याच्या दृष्टीने शासन नियमांचे पालन करून व्यवसाय करावा, आवाज मर्यादेचे पालन करावे, गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळीही आवाज मर्यादेचे पालन करावे अशा सूचना यावेळी पोलीस अधीक्षकांनी डी जे व्यावसायिकांना केल्या. शासन नियमानुसार डी जे व्यवसाय करावा त्याला कोणतेही बंधन घातले जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली असल्याची माहिती धीरज परब यांनी दिली. यावेळी मनसे उपजिल्हा प्रमुख गणेश वाईरकर, डी जे व्यावसायिक अमेय खांदारे, मंदार फाटक, गणेश लाड, प्रथमेश मेस्त्री यांच्यासह अनेक डी जे व्यावसायिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page