गणेशोत्सव काळात लायन्स क्लब मालवणकडून निर्माल्य संकलन उपक्रम…

⚡मालवण ता.२५-:
लायन्स क्लब मालवण तर्फे गणेशोत्सवानिमित्त ‘शाडू माती गणेश मूर्तीपूजन आणि निर्माल्य संकलन’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून मालवण बंदर जेटी येथील गणेश विसर्जन स्थळी निर्माल्य कलश ठेवून गणेश भक्तांकडून निर्माल्य संकलन करण्यात येणार आहे, अशी माहिती लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षा सौ. अनुष्का चव्हाण यांनी दिली.

याबाबत गणेशभक्तांना आवाहन करणारे पत्रक लायन्स क्लब मालवणच्या बैठकीत क्लबचे सदस्य रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी अध्यक्षा अनुष्का चव्हाण, सचिव मनाली दळवी, खजिनदार पूनम चव्हाण, लायन्स सदस्य रुजारिओ पिंटो, अवधूत चव्हाण, राजा शंकरदास, उमेश शिरोडकर, उदय घाटवळ, जयश्री हडकर, अंजली आचरेकर, दिक्षा गांवकर, नंदिनी गांवकर, रूपा कांदळगावकर, ऋग्वेदा धामापूरकर आदी उपस्थित होते.

मालवण बंदर जेटी किनाऱ्यावर गणेशोत्सवाच्या पाचव्या, सातव्या व अकराव्या दिवशी निर्माल्य कलश ठेवून गणेश मूर्ती विसर्जना सोबत आणलेले निर्माल्य लायन्स क्लबकडून संकलित करण्यात येणार आहे. निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले यांचा समावेश असावा, तसेच प्लास्टिक, थर्माकोल, कापडी वस्तू, खाद्य पदार्थ, मूर्ती किंवा त्याचे अवशेष यांचा समावेश नसावा. निर्माल्य समुद्र, नदी किंवा विहिरीत टाकू नये, तसेच शाडू माती नैसर्गिक व पर्यावरण पूरक तसेच पाण्यात विरघळणारी असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे पूजन करावे, असे आवाहन अनुष्का चव्हाण यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page