बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डंपरवर मालवण महसूल विभागाची कारवाई…

⚡मालवण ता.२३-:
मालवण तालुक्यातील कर्ली खाडीतून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डंपरवर मालवण महसूल विभागाने कारवाई करून हे डंपर जप्त करत डंपर चालकांवर मालवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे २ कोटी २० हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद मंडळ अधिकारी पीटर लोबो यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे.

काल सायंकाळी निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, संजय गांधी नायब तहसीलदार प्रिया हर्णे, मंडळ अधिकारी पीटर लोबो, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र तारी आणि भरत शिंगनाथ यांचे पथक देवली बोवलेकरवाडी जेटी खारबांध मार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना डंपर क्रमांक जीए ०४ टी १८६७, जीए ०९ यू ४७०७, जीए ०५ टी ६१३० आणि जीए ०४ टी २२७८ हे चार डंपर संशयास्पदरीत्या जाताना दिसले. पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला, मात्र ते न थांबता पुढे निघून गेले. सुमारे १०० मीटर अंतर पुढे गेल्यावर ते थांबले. यातील क्रमांक जीए ०४ टी १८६७ आणि जीए ०९ यू ४७०७ या दोन डंपरच्या चालकांनी डंपरमधील वाळू रस्त्यावर ओतून टाकली. तपासणी केली असता ही वाळू सुमारे ५ ब्रास असल्याचे आढळले. तर, उर्वरित दोन डंपर क्रमांक जीए ०५ टी ६१३० आणि जीए ०४ टी २२७८ रिकामे होते.

या प्रकरणी प्रथमेश बाळकृष्ण गावडे (वय २५), रा. माड्याचीवाडी ता. कुडाळ, गौरव अरुण नाईक (वय ३०), रा. रांगणा तुळसुली ता. कुडाळ शेखर संतोष राठोड (वय ४२), रा. गुढीपूर पिंगुळी ता. कुडाळ आणि शंकर सुरेश भितये (वय ३०) रा. गोठोस ता. कुडाळ या चार डंपर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चालक शासनाची कोणतीही परवानगी नसताना वाळूची चोरी करून ती घेऊन जात असताना पकडले गेले. या चारही डंपरची किंमत सुमारे २ कोटी २० हजार रुपये असून ते जप्त करण्यात आले आहेत. मंडळ अधिकारी पीटर लोबो यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी चारही डंपर चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, तहसीलदार वर्षा झालटे यांनी कर्ली व कालावल खाडीतील अनधिकृत बोटींवर मेरीटाईम बोर्डाने कारवाई करणे आवश्यक आहे. याबाबत आदेश देऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असे स्पष्ट केले.

You cannot copy content of this page