पायावरून डंपर गेल्याने बैल गंभीर जखमी…

प्राणीप्रेमी नागरिक व संस्थांनी उपचारासाठी घेतला पुढाकार..

⚡मालवण ता.२३-:
मालवण शहरातील सागरी महामार्गावर देऊळवाडा येथे काल रात्री रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका बैलाच्या पायावरून एका अज्ञात डंपर चालकाने डंपर नेल्याने बैलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार लक्षात येताच प्राणी प्रेमी नागरिक व काही संस्थांच्या मदतीने या बैलावर उपचार करून या बैलाला वैभववाडी येथील गाय वासरू गोशाळेमध्ये नेण्यात आले.

सागरी महामार्ग येथे रात्री बैलाच्या पायावरून डंपर गेल्याने बैलाच्या पायास गंभीर दुखापत होऊन तो रस्त्याच्या कडेला विव्हळत पडून होता. ही बाब सकाळी लक्षात येताच बजरंग दलाचे गणेश चव्हाण, श्रीराज बांदेकर, भाऊ सामंत, प्रसाद हळदणकर, तेजस चव्हाण, स्वप्नील करंगुटकार, तुषार पेडणेकर, युवराज, अभय कवटकर यांच्यासह आणि इतर नागरिकांनी धाव घेत बैलाच्या उपचारासाठी हालचाली सुरु केल्या. यावेळी मिशन आधार सिंधुदुर्ग च्या सदस्य अंकिता मयेकर आणि मनस्वी कदम घटना स्थळी दाखल झाल्या. तर सामाजिक कार्यकर्त्या सौ.शिल्पा खोत यांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय डॉ. राजन लांडगे यांनी त्याठिकाणी येऊन बैलावर उपचार केले. मात्र बैलाच्या मालकाबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

बैलाच्या डाव्या पायाचा तळव्याचा भाग तुटल्याने गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याने बैलाला गोशाळा मध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मिशन आधार सिंधुदुर्ग च्या सदस्या सौ. स्मृती कांदळगांवकर आणि मिशन आधार सिंधुदुर्गचे अध्यक्ष सम्राट कुडतरकर यांनी पुढाकार घेत वैभववाडी खांबळे येथील ‘गाय वासरू गोशाळा’ यांच्याशी संपर्क केला. परंतु गोशाळेची गाडी आणि माणसे उपलबध न झाल्याने सम्राट कुडतरकर, सहकारी अप्पू राणे, विश्राम केळूसकर व वामन सावंत यांनी स्वतः घटना स्थळी येऊन हे काम हाती घेतले. तसेच मिशन आधार च्या सदस्या सौं. कल्पना बोवलेकर यांनी टेम्पोची व्यवस्था करून जखमी बैलाला गोशाळेला सुपूर्द करण्यात आले. त्याठिकाणी बैलावर उपचार करण्यात येत आहेत.

You cannot copy content of this page