बाळा नाईक:युती धर्म तोडलेल्यांनी आता होणाऱ्या संघर्षासाठी संजू परब यांनी सज्ज राहावे..
⚡दोडामार्ग,२३ : लक्ष्मण उर्फ बाळा नाईक यांनी आज शिवसेना (शिंदे) पक्षामध्ये प्रवेश केला असला, तरी त्यांचं भाजपाशी काहीही देणंघेणं नाही. कारण वर्षभरापूर्वीच पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांचं निलंबन वरिष्ठांकडून झालं होतं, अशी ठाम भूमिका भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी स्पष्ट केली.
जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी बाळा नाईक भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा उल्लेख केला. मात्र ही जनतेची दिशाभूल असल्याचं दीपक गवस यांनी म्हटलं आहे. बाळा नाईक भाजपात कार्यरत नव्हते, त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेशाचा प्रचार करताना त्यांना भाजपाशी जोडणं चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
“भाजपाच्या कार्यकर्त्यांवर कुणीही शंका घेऊ नये. पक्षाशी निष्ठावान राहणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच भाजपाची ताकद आहे. निलंबित केलेले कार्यकर्ते भाजपाचे नाहीत, त्यांची पक्षांतरे ही त्यांची वैयक्तिक बाब आहे,” असं तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी नमूद केले आहे.