लाच घेतल्याचा ठपका:न्यायालयाने २५ पर्यंत बजावली कोठडी..
ओरोस ता २३
मळगाव येथे लाच घेताना रंगेहाथ पकडले गेलेले इन्सुली ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानदेव सीताराम चव्हाण यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सेवेतून निलंबित केले आहे. दरम्यान, चव्हाण यांना जिल्हा न्यायालयाने २५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली ग्राम पंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानदेव चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मळगाव येथे लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. चव्हाण यांच्याकडे इन्सुली ग्राम पंचायतीचा मूळ पदभार असून मळगाव ग्राम पंचायतीचा अतिरिक्त पदभार आहे. येथे कार्यरत असताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने या प्रकरणाची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी घेतली आहे. ग्रामपंचायत अधिकारी चव्हाण यांना तात्काळ सेवेतून निलंबित केले आहे.
दरम्यान, मळगाव येथे लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानदेव चव्हाण यांना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश डॉ सुधीर देशपांडे यांच्या न्यायालयात शनिवारी हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना लाच स्वीकारल्या प्रकरणी २५ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.