मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल:राजकीय वरदहस्त बाजूला करून पोलिसांना फ्रीहँड देण्याची मागणी..
कुडाळ : पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली अवैध मटका धाड प्रकरणी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना निलंबित करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा प्रश्न खरोखरच कायमस्वरूपी निकालात निघेला का, असा सवाल मनसेचे उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. अवैध धंदेवाईकांवरील राजकीय वरदहस्त प्रामाणिकपणे बाजूला काढून पोलीस प्रशासनाला फ्रीहँड द्यावा अशी मागणी देखील कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर म्हणतात, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लागून असलेल्या गोवा राज्यातून फार मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक राजरोसपणे होते. हि दारू वाहतूक करताना सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीमध्ये चार ते पाच चेक पोस्ट पार करत राजरोसपणे मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक केली जाते. या अवैध दारू वाहतुकीमध्ये काही राजकीय वरदहस्त लाभलेलेच आजी माजी लोकप्रतिनिधी त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे कार्यकर्ते गुंतलेले असल्यामुळेच पोलीस प्रशासनाला त्यांच्यावर कारवाई करणे जड जात असावे. काही अवैध धंदे करणारेच बड्या लोकप्रतिनिधींच्या जन्मदिवसानिमित्त गडगंज पैसा खर्च करून मोठमोठे बॅनर लावून प्रशासनावर वचक ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच या जिल्ह्यामध्ये करत असतात. यावर देखील पालकमंत्री नितेश राणे यांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या गणेश चतुर्थी नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा पालकमंत्री नितेश राणे यांना सहकार्य म्हणून जिल्ह्यातील अवैध धंदेवाईकांची नावे ठिकाणासहित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना देणार आहोत. त्याचप्रमाणे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांना कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करण्याची हिंमत देण्याची मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.