⚡बांदा ता.२२-: बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांबाबत मनसे तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधले. यावेळी राणे यांनी याची तात्काळ दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश खेबुडकर यांना रिक्त जागेवर तातडीने नवीन परिचारिका नियुक्त करण्याचे आदेश दिलेत. तसेच आरोग्य केंद्रातील प्रलंबित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्यात.
श्री सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री राणे यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश खेबूडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.
श्री सावंत म्हणाले की, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र हे महामार्गावरील महत्वाचे आरोग्य केंद्र असून दर दिवशी सरासरी २५० हून अधिक बाह्य रुग्ण असतात. तसेच आपत्कालीन स्थितीत देखील असंख्य रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. आरोग्य केंद्रातील मुख्य परिचारिकेची बदली झाल्याने गेले एक महिना हे पद रिक्त आहे. तसेच सफाई कर्मचारी नसल्याने रुग्णालय परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे तात्काळ नियुक्ती करावी.
पालकमंत्री राणे यांनी याबाबत खेबूडकर यांच्याशी चर्चा करत तात्काळ परिचारिका देण्याचे आदेश दिलेत तसेच आरोग्य केंद्राच्या समस्या गणेश चतुर्थीपूर्वी मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्यात.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांबाबत मिलिंद सावंत यांनी वेधले पालकमंत्र्यांचं लक्ष…!
