जयवंत दळवींच्या साहित्याचे पारडे अधिक जड…

विश्वास पाटील:जयवंत दळवींच्या जन्मशताब्दीनिमित्त मालवणात चर्चासत्र..

⚡मालवण ता.१७-:
जयवंत दळवी यांचे साहित्य हे वास्तववादी जसे होते तसे त्यांच्या साहित्यात आशय आणि विषय हा ठासून भरलेला आहे. चक्र आणि अंधारातल्या पारंब्या या दोन कादंबऱ्या तर नवलेखकांसाठी वस्तूपाठ आहेत, असे असले तरी मराठीतील प्राध्यापिकी समीक्षकांनी जयवंत दळवीना त्यांच्या साहित्याच्या कुवतीला जोखणारी फारशी पारितोषिके मिळू दिली नाहीत. परंतु दळवी हे आपल्या शब्दाच्या सामर्थ्यावर साहित्याच्या दालनात आजही टिकून आहेत, असे गौरवोद्गार साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि पानिपतकार विश्वास पाटील यांनी येथे बोलताना काढले.

साहित्य अकादमी आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित ‘जयवंत दळवी व्यक्ती आणि साहित्य’ या चर्चासत्राचे उदघाट्न विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विश्वास पाटील हे बोलत होते. यावेळी जयवंत दळवी यांचे सुपुत्र गिरीश दळवी, सुप्रसिद्ध साहित्यिक प्रवीण बांदेकर, साहित्य अकादमी मुंबई विभागीय कार्यालय प्रभारी अधिकारी ओमप्रकाश नागर, बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर, कवी महेश केळूसकर, प्रेमानंद गजवी, वामन पंडित, शरयू आसोलकर, संजय कळमकर, गोविंद काजरेकर, श्रीकांत बोजेवार, लक्ष्मीकांत खोबरेकर ज्योती तोरसकर आदी व इतर उपस्थित होते.

प्रारंभी ओमप्रकाश नागर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर देवदत्त परुळेकर यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले, चक्र हि कादंबरी मराठी साहित्यातील लखलखीत नाणे आहे. काहीजण कादंबरी न वाचताच स्मिता पाटील यांचे पोस्टर असलेला चक्र चित्रपट पाहताच आणि त्या चित्रपटावरून चक्र कादंबरी वाचल्याचे समाधान मानतात. परंतु चक्र हा चित्रपट दिग्दर्शकाने उत्तम केला असेलही परंतु, दळवी यांनी चक्र यां कादंबरीत जो आशय आणि विषय मांडला आहे तो १५ टक्केही चित्रपटात आलेला नाही. चक्र कादंबरीत संपादित झालेली शब्द संपदा हि कमावलेली ऐकलेली आणि अभ्यासलेली आहे की त्याची एक चांगली डिक्शनरी होईल. चक्र कादंबरीत झोपडपट्टीतील भगभगीत, ठसठशीत आणि हृदयद्रावक असे चित्रण उमटले आहे, असे सांगून ते म्हणाले भाऊ पाध्ये यांचे अख्खे साहित्य घातले आणि दुसऱ्या पारड्यात जयवंत दळवी यांचे साहित्य घातले तर निश्चितच दळवी यांचे पारडे जड असेल. कादंबरी म्हटली की पाचशे पानांची ते आठशे पानांची असायला हवी असा समज आहे. परंतु अल्प शब्दात भव्य दिव्य किंवा अवाढव्य अर्थ कमी पानाच्या कादंबरीतही कादंबरीकार देऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे अंधारातल्या पारंब्या ही कादंबरी होय. जयवंत दळवी यांच्या सर्वच कादंबऱ्या आणि साहित्य हे आशयघन असल्याने मराठी साहित्यात दळवी यांचे साहित्य अनमोल आहे. विसाव्या शतकातील लेखक श्रेष्ठ की एकविसाव्या शतकातील लेखक श्रेष्ठ हे मराठी लेखकांनी न ठरवता ते ठरविण्याची जबाबदारी पुढच्या पिढीच्या हातात द्यावी असेही पाटील म्हणाले.

यावेळी साहित्यिक प्रवीण बांदेकर यांचे जयवंत दळवी यांच्या साहित्यावर समीक्षा करणारे व्याख्यान झाले. शेवटी लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योती तोरस्कर यांनी केले

You cannot copy content of this page