डॉ. संजय सावंत:समर्थ अकॅडेमीचा विद्यार्थी गुणवंत सोहळा संपन्न..
⚡कुडाळ ता.११-: सतरा वर्षात यशाची परंपरा जोपासणारी समर्थ अकॅडमी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासून कार्यरत आहे हे विशेष आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे माजी अध्यक्ष तथा सुमेध लॅबचे संचालक डॉ संजय सावंत यांनी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात केले.
कुडाळ येथील गुणवत्ता हाच आमचा ध्यास हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या समर्थ अकॅडमीच्या वतीने दहावी बारावी व स्कोलरशिप परिक्षेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्थेच्या कार्यालयात डॉ संजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कुडाळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि समर्थ अकॅडमीचे मार्गदर्शक अनंत जामसंडेकर, समर्थ अकॅडमीचे संचालक गजानन कांदळगावकर, गुरुप्रसाद वेंगुर्लेकर, चैतन्य सुकी, प्रसाद परब, गीता बेलवलकर विद्यार्थी पालक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ संजय सावंत म्हणाले, समर्थ अकॅडमीने गेली सतरा वर्षे शैक्षणिक क्षेत्रात यशाची कमान गाठली आहे, हीच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना मिळालेली शैक्षणिक क्षेत्रातील मोठी पोचपावती आहे. स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना आपल्याकडे अनेक आव्हाने आहेत. या आव्हानाला सामोरे जाताना प्रचंड मेहनत महत्त्वाची आहे. डॉक्टर, इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी वाटचाल केली पाहिजे. समर्थ अकॅडमी जशी शैक्षणिक गुणवत्ता घेऊन वाटचाल करते तसेच सामाजिक क्षेत्रात या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी आता भविष्याचा वेध घेताना जिथे आवश्यक असेल तिथेच मोबाईलचा वापर करावा असे सांगितले.
श्री जामसंडेकर म्हणले, समर्थ अकॅडमीमध्ये बेसिक परफेक्ट केले जाते. शिस्त फार महत्त्वाची आहे. या शिस्तीचे अवलोकन करून समर्थने वाटचाल केली आहे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांची प्रचंड मेहनत फार महत्त्वाची आहे. विद्यार्थी पालक आणि शिक्षक यातून खरा विकास होत असतो या त्रिवेणी संगमासाठी तिघांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थीनी निधी सावंत हिने विद्यार्थ्यासाठी गुरु हा महत्त्वाचा असतो. भविष्यात पुढे जाण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. आम्हाला यशाचा मार्ग समर्थने दाखवला आणि जी कौतुकाची थाप मिळाली ती आम्हाला पुढे प्रेरणा देणारी ठरणार असल्याचे सांगितले. पालक सौ धुरी सौ. प्रभू तर विद्यार्थ्यांनी सलोनी तेली यांनी सुद्धा समर्थ ची यशोगाथा सांगितली
यावेळी गुणवंतांचा गौरव करण्यात आला. दहावी – स्मितेश कडुलकर, निधी सावंत , रिया पाटणकर, गायत्री शिंदे प्रथम सावंत,शुभम पिंगुळकर यशराज खानोलकर, गणेश दरवडा, नीरज पाटकर, दिव्या राऊळ,आर्या आव्हाड, मनस्वी नाईक, मैथिली गावडे ,श्रेयस चव्हाण, वरद प्रभू, अजिंक्य आडसरे, वेदांत रोहिले, श्रावणी धामापूरकर, आस्था बिड्ये, बारावी- मनस्वी मर्गज, रुचिरा चव्हाण, केतकी साळवी, तृप्ती गावडे, सलोनी तेली, तनवी आरेकर . आठवी – प्राविण्य प्रज्ञा परीक्षा नील कांदळगावकर, आठवी स्कॉलरशिप – रुशील धुरी, मनस्वी झेंडे, नील कांदळगावकर या गुणवंतांना डॉ सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या यशात समर्थ आणि शिक्षक वर्ग यांचे योगदान फार मोठे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य सुकी यांनी केले तर आभार साईप्रसाद वेंगुर्लेकर यांनी मानले