राजा गांवकर:शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मांडल्या भूमिका..
⚡मालवण ता.११-:
शिवसेना मच्छिमार सेल जिल्हाप्रमुख तसेच जिल्हा प्रवक्तेपद हे आपल्याला देऊन मोठी जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. पक्षाची ध्येय धोरणे पोहचविण्याचे काम या मार्फत केले जाईल. मच्छिमार हा समाजातील मोठा घटक असून शिवसेना मच्छिमार सेलच्या माध्यमातून मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जातील, असे शिवसेना मच्छिमार सेल जिल्हाप्रमुख राजा गांवकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मालवण येथील शिवसेना कार्यालयात नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना मच्छीमार सेल जिल्हाप्रमुख व जिल्हा प्रवक्ते राजा गावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख व कणकवली विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे तसेच जिल्हा समन्वयक म्हणून फेर निवड झालेले माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख दिपक पाटकर आदी प्रमुख पदाधिकारी तसेच विश्वास गांवकर, बाळू नाटेकर, आबा शिरसेकर, शिवाजी केळुसकर, राजेंद्र परुळेकर, अरुण तोडणकर, बाळा जाधव, अंजना सामंत, सोनाली पाटकर, गीता नाटेकर, मार्टिन फर्नांडिस, कविता मोंडकर, मधुरा तुळसकर, संदीप भोजने, प्रदीप मोर्जे, निषय पालेकर, राजू बिडये, अभय कदम, लुद्दीन फर्नांडिस, विलास मुणगेकर, संग्राम साळसकर, आनंद खवणेकर, भाई मांजरेकर आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मच्छीमार सेल जिल्हाप्रमुख राजा गावकर यांनी किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार नीलेश राणे यांनी आक्रमकपणे विधानसभेत आपल्या पहिल्या भाषणात मच्छीमारांचा प्रश्न उपस्थित केला आहे. किनारपट्टीवरील धूपप्रतिबंधक बंधारे पूर्ण होण्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा सुरू केला आहे. खास. नारायण राणे, मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मच्छिमारांचे प्रश्न सोडविले जातील, विजयदुर्ग बंदरा पर्यंत येणारी रो रो बोट सेवा मालवण वं वेंगुर्ला बंदरापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू, परप्रांतीय ट्रॉलर्स वरील करावाईत सातत्य ठेवण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
कणकवली विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी आपल्याकडे उपजिल्हाप्रमुख पद आणि कणकवली मतदार संघात शिवसेना वाढविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. संघटना मजबूत करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार, आम. निलेश राणे यांचा शब्द पडू देणार नाही, असे सांगितले.
जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर यांनी सध्या शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जोमाने उभी राहत आहेत. गावागावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. कोट्यवधी रूपयांचा निधी आमदार निलेश राणे आणण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. होत असलेल्या विकासकामांमुळे आणि प्रलंबीत असलेली विकासकामे पूर्ण होत असल्याने मतदार संघ विकास प्रक्रीयेत पुढे जात आहे. यामुळे भविष्यात संघटना मजबुत होण्यासाठी बळ मिळणार आहे, असे सांगितले.
तर शहरप्रमुख दीपक पाटकर म्हणाले, शहरातील सर्व विभागातून पदाधिकारी नियुक्त केले आहेत. काम करणारे पदाधिकारी सध्या शिवसेनेकडे आले आहेत. शहरातील सर्वच्या सर्व २० जागांवर शिवसेना उमेदवार उभे करण्याची ताकद आमच्यामध्ये निर्माण झाली आहे. शिवसेना आमदार नीलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आले आहेत. यामुळे आगामी निवडणुकीसाठी आम्ही सज्ज झालो आहोत, असेही श्री. पाटकर म्हणाले.