⚡मालवण ता.११-:
मालवण शहरातील मेढा-कुशेवाडा परिसरात विजेच्या धक्क्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. या परिसरातील असलेल्या एका विद्युत फ्यूज बॉक्सला स्पर्श झाल्याने या बैलास विजेचा धक्का बसून तो जागीच गतप्राण झाला. मेढा येथील ज्ञानेश्वर जनार्दन मुळेकर यांच्या मालकीचा हा बैल होता. बैलाच्या मृत्यूमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हा अपघात घडल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने वीज महावितरण कंपनीला कळविले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वीजपुरवठा खंडित केला. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. विद्युत पेटीला चिकटलेल्या बैलाला स्थानिकांच्या मदतीने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बाजूला केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्ञानेश्वर मुळेकर यांनी आपल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीकडे मागणी केली आहे. महावितरणने अशा धोकादायक विद्युत पेटींची पाहणी करून त्यांची दुरुस्ती करावी व ते सुरक्षित करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे वीज महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.