सिंधुदुर्ग कॅरमच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा..
कुडाळ : पुणे येथे सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २ ऱ्या महाराष्ट्र वरिष्ठ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सावंतवाडीच्या केशर राजेश निर्गुण हिने विजेतेपद पटकावले. ही कॅरम स्पर्धा दि. ८,९, १० ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाली.
सिंधुदुर्ग कॅरमची वंडर गर्ल सावंतवाडीची केशर निर्गुण या स्पर्धेची महिला गटाची विजेती ठरली. केशरने यापूर्वी कनिष्ठ गटाचं दोन वेळा राज्य अजिंक्यपद पटकावल आहे. ज्युनिअर असताना वरिष्ठ गटामधून खेळताना केशरने २०२२ साली राज्यस्तरीय महिला वरिष्ठ गट निवड चाचणीचे विजेतेपद मिळवले होते. २०२४ मधे महाराष्ट्राच्या पहिल्या वाहिल्या रॅपिडो सुपर सिक्स स्पधेचं महिला गटाचं जेतेपद थाटात जिंकलं होतं. परंतु राज्य मानांकन स्पर्धेची अंतिम फेरी अनेकदा गाठूनही उपविजेते पदावरच समाधान मानावं लागत होतं.
रविवारी उपउपान्त्य फेरीत केशरची गाठ रत्नागिरीच्या आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या आकांक्षा कदम हिच्याशी होती. चुरशीच्या तीन गेम्स पर्यंत चाललेल्या सामन्यात आकांक्षावर केशरने शेवटच्या २ बोर्डमधे आक्रमक खेळ करत विजय मिळवला. आत्मविश्वास दुणावलेल्या केशरने मग उपान्त्य फेरीत मुंबईच्या सोनाली कुमारीचा आणि अंतिम फेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरचा सरळ सेटस् मधे फडशा पाडत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मानाचं स्वतःचं पहिलं वरिष्ठ राज्य मानांकन विजेतेपद पदरात पाडून घेतलं.
केशरच्या या विजयाने तिच्या कुदुंबासहीत संपूर्ण जिल्ह्यातील कॅरम परिवारात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलं आहे.