नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणात भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन…

महिलांसाठी नारळी लढविणे स्पर्धा व रिक्षा रॅलीचे आयोजन..

⚡मालवण ता.०५-:
मालवणात भाजप तर्फे नारळी पौर्णिमा उत्सव विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा, रिक्षा व्यवसायिकांची पर्यटन सांस्कृतिक रॅली, रिक्षा सजावट स्पर्धा, श्रीफळ पूजन व अर्पण तसेच ‘एक राखी लाडक्या देवाभाऊंसाठी’ असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शहरध्यक्ष बाबा मोंडकर, केदार झाड, पप्या कद्रेकर, मंगेश जावकर, सहदेव साळगावकर, अन्वेषा आचरेकर, पूजा सरकारे, महिमा मयेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, मनोज मेथर, ललित चव्हाण, रामा चोपडेकर, मिलिंद झाड, रवींद्र खानविलकर, कॅलिस फर्नांडीस आदी उपस्थित होते.

यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, भाजप मालवण तालुक्यातर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा ८ ऑगस्टला दुपारी ३ वाजता मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आली आहे. यात प्रथम पारितोषिक- रेफ्रिजरेटर, द्वितीय पारितोषिक- वॉशिंग मशीन, तृतीय पारितोषिक- फॅन, उत्तेजनार्थ फॅन अशी आकर्षक बक्षिसे आहेत. तसेच सहभागी होणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला असून त्यातील विजेत्यांसाठी प्रथम – सोन्याची नथ, द्वितीय- चांदीचा करंडा, तृतीय- चांदीचा छल्ला अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी नारळ आयोजकांकडून दिले जातील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सौ. अन्वेशा आचरेकर ८१८०९६६८३३, महिमा मयेकर – ९४०५६२४७००
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बाबा मोंडकर यांनी केले.

जिल्ह्याच्या पर्यटन वाढीत रिक्षा व्यवसायिकांचे मोठे योगदान आहे. रिक्षा व्यवसायिकांच्या सन्मानासाठी पर्यटन महासंघ, तारकर्ली पर्यटन विकास संस्था, रिक्षा व्यावसायिक संघटना व भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने गेली चार वर्षे नारळी पौर्णिमे दिवशी रिक्षांची पर्यटन सांस्कृतिक रॅली काढण्यात येते. यावर्षी देखील दि. ८ रोजी भरड नाका ते बंदर जेटी अशी रॅली काढण्यात येणार आहे. भरड नाक्यावर दुपारी २.३० वाजता भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते या रॅलीचे उदघाटन होईल. यानिमित्त उत्कृष्ट रिक्षा सजावट स्पर्धा घेण्यात येणार असून प्रथम क्रमांकास रु. १० हजार व द्वितीय क्रमांकास रु. ५ हजार तसेच इतर उत्तेजनार्थ बक्षिसे व सहभागी होणाऱ्या रिक्षा चालकांना सहभाग सन्मान धन देण्यात येणार आहे. रिक्षा रॅली नंतर बंदर जेटीवर रिक्षा व्यावसायिक तसेच रीलस्टार, युट्युबर्स यांच्या हस्ते श्रीफळ पूजन करून सागरास अर्पण करण्यात येणार आहे. रिक्षा रॅलीत व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहदेव साळगावकर ९४२०९३५०५०, पप्या कद्रेकर – ९८२३०९६१५६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मोंडकर यांनी केले.

भाजपने राज्यात घेतलेल्या विविध विकासात्मक निर्णयांचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते, यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘एक राखी लाडक्या देवाभाऊ साठी’ हा उपक्रम राबविला जाणार असून मालवण शहर व तालुक्यातील एकूण १२१ बूथ वरून १०० राख्या व शुभसंदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपतर्फे पाठविण्यात येणार आहे. मालवण बंदर जेटी येथे नारळी पौर्णिमेदिवशी नारळ लढविणे स्पर्धेच्या दरम्यान ४ वा. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती यावेळी बाबा मोंडकर यांनी दिली.

You cannot copy content of this page