⚡वेंगुर्ला ता.०२-: वेताळ पतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने आजी-माजी सैनिक व पोलिस यांच्या पत्नी आणि मातांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पती किवा पुत्र देशसीमेवर, किवा समाजरक्षणाच्या जबाबदारीत व्यस्त असताना, या स्त्रियांनी घर, जबाबदा-या, भावनिक संघर्ष, अपार धैर्य आणि समर्पण यांची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. त्यांच्या आत्मसन्मान, कर्तव्यपूर्ती आणि त्यागमय कथा समाजासाठी प्ररणादायी आहेत. या अनुभवांना शब्दरूप देण्याचे व्यासपीठ म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
‘तो देशासाठी, मी घरासाठी – पण आम्ही दोघंही देशभक्त‘ यावर निबंध लिहितांना सैनिक, पोलिस यांच्या पत्नी किवा मातांनी स्वतःच्या जीवनातील वास्तव अनुभव, भावनिक संघर्ष, कर्तव्यपूर्ती आणि आत्मसन्मान याबाबत मांडणी करायची आहे. निबंध मराठी भाषेत स्वः हस्ताक्षरात कागदाच्या एका बाजूला ७०० ते १००० शब्दांत लिहिलेला असावा. निबंधासोबत पती किवा पुत्र सैनिक, पोलिस असल्याचे अधिकृत दस्तऐवज (ओळखपत्र छायाप्रत किवा अधिकृत पत्र) जोडणे आवश्यक आहे.
स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १ हजार, ७००, ५००, चषक व प्रमाणपत्र तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी २५० रूपये, चषक व प्रमाणपत्र देण्यात येतील. इच्छुकांनी ५ सप्टेंबरपर्यंत वेताळ पतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस द्वाराः प्रा.डॉ.सचिन वासुदेव परुळकर, मु.पो.तुळस, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग-४१६५१५ या पत्त्यावर आपले निबंध पाठवावेत. अधिक माहितीसाठी ९४२१२३८०५३ यावर संफ साधवा.
या स्पर्धेमुळे सैनिक व पोलिसांच्या कुटुंबातील महिलांचे अनुभव, त्यांचा त्याग व संघर्ष समाजासमोर येणार असून, त्यांच्या अज्ञात समर्पणाला गौरव मिळणार आहे. तरी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपली कहाणी जगापर्यंत पोहोचवा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री आणि वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.
तो देशासाठी, मी घरासाठी – सैनिक व पोलिसांच्या पत्नी-मातांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा…
