प्रतीक महाडवाला यांच्याकडे तात्पुरता कार्यभार..
⚡मालवण ता.०२-:
मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर हे वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याने त्यांच्या पदाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी प्रतीक महाडवाला यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर रत्नागिरी येथील कार्यालयाचा पदभार मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जि. द. सावंत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यात शुक्रवार एक ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामास सुरुवात झाली आहे. अशातच उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकारी व मच्छीमारांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयास शुक्रवारी भेट दिली. मात्र, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर हे अनुपस्थित असल्याचे दिसून आल्याने संतप्त शिवसेना पदाधिकारी व मच्छीमारांनी त्यांच्या केबिनलाच हार घालून निषेध व्यक्त केला.
या घटनेनंतर सायंकाळी मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी कार्यालयीन आदेशाचे पत्र काढत मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर हे “वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याने त्यांच्या पदाचा तात्पुरत्या स्वरुपातील कार्यभार हा सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी प्रतीक महाडवाला यांच्याकडे, तर रत्नागिरी येथील कार्यालयाचा पदभार जि. द. सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे, असे स्पष्ट केले.
प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरुपात हा पदभार देण्यात आला असून श्री. कुवेसकर हे पूर्ववत होताच त्यांच्याकडे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त पदाचा कार्यभार राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.