कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजानिक आरोग्य विभागाची कर्करोग मोबाईल व्हॅन सोमवार, ४ ऑगस्टला कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल होणार आहे. ही व्हॅन या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वा. पर्यंत असणार आहे. या व्हॅनमध्ये कर्करोग तपासणीच्या विविधा सुविधा उपलब्ध असणार आहेत. यात मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग या तपासण्यांचा समावेश आहे.
दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी तोंड येणे, तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा असणे, तोंड उघडायला त्रास होणे अशी मुख कर्करोगाची, मासिक पाळी व्यतिरिक्त योनीतून रक्तस्त्राव होणो, मासिक पाळीचे चक्र बंद झाल्यावर रक्तस्त्राव होणे, शारिरीक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे, योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे ही गर्भाशय मुख कर्करोगाची तर स्तनामध्ये गाठ येणे, स्तनाच्या आकारात बदल होणे, स्तनाग्रामधून पू किंव रक्तस्त्राव होणे ही स्तन कर्करोगाची उदाहरणे आहेत. अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तपासणीचा लाभघ्यावा. तपासणीला येताना रुग्णांनी आधारकार्ड व आधारकार्डलिंक असलेला मोबाईल आणावा, असे आवाहन ओरोस जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी केले आहे.