नागरिकांना सहभागाचे आवाहन: सर्वपक्षीय व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आवाहन..
⚡सावंतवाडी ता.०२-: स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आणि वाढीव वीजबिलांच्या विरोधात सावंतवाडीतील नागरिक येत्या सोमवारी, ४ ऑगस्ट रोजी मोठे जनआंदोलन करणार आहेत. सर्वपक्षीय सह संघटनेच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. सरकारने गावाकऱ्यांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती थांबवावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. नागरिकांनी सर्व स्मार्ट मीटर धारकांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे ८०० रुपयांपर्यंत येणारे वीजबिल आता ३००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. स्मार्ट मीटरच्या नावाखाली लोकांची आर्थिक पिळवणूक केली जात असून, एका विशिष्ट कंपनीलाच याचा फायदा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “स्मार्ट मीटर म्हणजे लोकांचे खिसे रिकामे करण्याचे काम चालू आहे,” अशी तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे.
वाढीव बिलांमुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत स्मार्ट मीटरची सक्ती आणखी भर घालत आहे. जर प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर न्यायालयात दाद मागण्यासाठीही मागे हटणार नाही, असा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या जनआंदोलनातून नागरिक आपला रोष व्यक्त करून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.