⚡मालवण,ता.०१-:
मालवण कसाल मुख्य रस्त्यावरील वराड कुसरवे येथील तिठ्यावर गांजाची देवाण-घेवाण करताना चार जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण व मालवण पोलिसांच्या संयुक्त पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातील दोन दुचाकी, सहा मोबाईल व गांजा असा सुमारे १ लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल गुरुवारी रात्री ८.१५ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. संशयितांवर गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क)२० (ब) आयआयए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक व मालवण पोलिसांच्या संयुक्त पथकाने मालवण कसाल रस्त्यावरील वराड कुसरवे तिठ्यावर ही संयुक्त कारवाई केली. यात गांजाची देवाण घेवाण करताना संदीप विनायक परब (वय-४१) रा. वराड कुसरवे मूळ रा. शिवनेरी बिल्डिंग पहिला मजला दादासाहेब फाळके रोड दादर मुंबई, अविरत गणेश धवन (वय-३१) रा. हरकुळ बुद्रुक व्हावटवाडी ता. कणकवली, हेमंत अनिल भोगले (वय-२४) रा. हरकुळ बुद्रुक कसालकरवाडी ता.कणकवली, आकाश शिवाजी निकम (वय-२४) रा. नाथ पै नगर कणकवली ता. कणकवली यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून ७ हजार २०० रुपयांचा गांजा, ४१ हजार ५०० रुपये किंमतीचे सहा मोबाईल, ६९ हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी आढळून आल्या. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे कर्मचारी विल्सन डिसोझा यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
गांजाची देवाण-घेवाण करताना चार जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने रंगेहाथ पकडले…!
