कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयात गणित विभागातर्फे ‘पाय ॲप्रोग्झिमेशन डे’ (२२ जुलै २०२५) शैक्षणिक वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘पाय’ संकल्पनेवर आधारित स्वतः तयार केलेल्या लघुचित्रफितींची (रील्स) स्पर्धा आणि अनोखी स्मरणक्षमता स्पर्धा हे या दिवसाचे वैशिट्य ठरले. हा उपक्रम विद्यार्थ्यांना नवे विचार, नव्या दिशा व गणिताची रुची निर्माण करणारा ठरला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते प्रा. प्रशांत केरवडेकर यांनी ‘पाय’ या संकल्पनेविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तिचा उपयोग विविध आधुनिक क्षेत्रांमध्ये कसा होतो हे अत्यंत रंजक उदाहरणांसह स्पष्ट केले. ऑटोकॅड, संगणक प्रणालीमधील गणिती पायाभूत प्रक्रिया, कृत्रिम तंत्रबुद्धी, वस्तू ओळख प्रणाली, प्रतिमा विश्लेषण यामध्ये ‘पाय’ चे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी ‘पाय’ संकल्पनेवर आधारित स्वतः तयार केलेल्या लघुचित्रफितींची (रील्स) स्पर्धा घेण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी अनोखी स्मरणक्षमता आधारित कृती राबवण्यात आली, ज्यामध्ये ‘पाय’ या संख्येचे दशांश किती अचूकपणे लक्षात ठेवता येतात, याचा अनुभव विद्यार्थ्यांनी कृतीतून घेतला.
प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी ‘पाय’ चा इतिहास, त्याचे गणितातील स्थान व आजच्या युगातील उपयुक्तता यावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपक्रमांचे कौतुक करत असे उपक्रम बदलत्या काळाच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना सृजनशीलतेकडे वळवतील असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी विवेक देसाई यांनी ‘पाय’ या संकल्पनेची व्याप्ती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रा. राहुल देशमुख यांनी करून दिली. त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचे महत्व व रूपरेषा स्पष्ट केली. सर्व मान्यवरांचे स्वागत गणित विभागप्रमुख डॉ. श्रीधर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन तृतीय वर्षातील विद्यार्थिनी प्राजक्ता थोरात आणि मानसी चिंदरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नागेश काळे यांनी केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांना नवे विचार, नव्या दिशा व गणिताची रुची निर्माण करणारा ठरला.
संत राऊळ महाराज महाविद्यालयात ‘पाय ॲप्रोग्झिमेशन डे’ उत्साहात साजरा…
