सुभेदार मेजर संजय सावंत:सिंदूर योद्धा सुभेदार मेजर संजय सावंत यांचा रोटरी तर्फे सन्मान,कुडाळ मध्ये एनसीसीचे प्रशिक्षक आणि कॅडेट्सचा गौरव..
⚡कुडाळ ता.२५-: राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेटस (विद्यार्थी) हे भारताचे भावी सैनिक आहेत,राष्ट्रप्रेम हेच सर्वोच्च मानून देशसेवेसाठी आयुष्याचे समर्पण सैनिकासाठी सर्वोच्च असते असे गौरवोद्गार रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथील सन्मान एका योध्दायाचा कार्यक्रमात भारतीय सैन्यदलातील 28 पदनाभन एअर डिफेन्स युनिट प्रमूख सुभेदार मेजर संजय सावंत यांनी व्यक्त केले.
भारतीय सैन्यदलात 28 पदनाभन एअर डिफेन्स युनिट प्रमूखपदी कार्यरत असणारे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांच्या अतुलनिय पराक्रमाबद्दल रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून कुडाळ तहसिलदार विरसिंग वसावे यांचेहस्ते भव्य सत्कार करण्यात आला यावेळी मानपत्र, शाल देवून सन्मानित करण्यात आले. संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ कडून सुभेदार मेजर संजय सावंत यांचे स्वागत प्राचार्य डाॅ स्मिता सुरवसे यांचे हस्ते करण्यात आले.सुभेदार मेजर संजय सावंत यांनी सैन्यदलातील कारगिल युद्धात ऑपरेशन विजय, पुलवामा ॲटॅक वेळी बालाकोट एअर स्ट्राईक, ऑपरेशन पराक्रम, सर्जिकल स्ट्राईक, ऑपरेशन सिंदूर अशा विविध कामगिरीवर धैर्य, साहस,जिद्द, राष्ट्रप्रेम, पराक्रमावर मोहिमा यशस्वी करत भारताचे संरक्षण करण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष राजीव पवार, कुडाळचे तहसिलदार विरसिंग वसावे, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने,गव्हर्नर एरिया एड डाॅ.विद्याधर तायशेट्ये, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली, संत राऊळ महाराज महाविद्यालय प्राचार्या डाॅ स्मिता सुरवसे, निवृत्त कॅप्टन शंकर भाईप, क्रेडाई सिंधुदुर्ग अध्यक्ष गजानन कांदळगावकर, कॅप्टन डाॅ एस.टी.आवटे,सचिव मकरंद नाईक, डाॅ रविंद्र जोशी, राजन बोभाटे, प्रमोद भोगटे, रूपेश तेली, शशिकांत चव्हाण, भाऊ बाक्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुभेदार मेजर संजय सावंत म्हणाले, देश आपल्यासाठी नाही तर आपण देशासाठी आहोत. सुभेदार मेजर संजय सावंत यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना विविध प्रसंग ऐकून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. ऑपरेशन सिंधूर मधील अनेक प्रसंग सुभेदार मेजर संजय सावंत व्यक्त होताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सैनिकांच्या वैभवशाली परंपरेचा घटक असल्याबाबत सार्थ अभिमान असल्याचे व्यक्त केले. बालपणी जिल्हा परिषद शाळेत घेतलेले शिक्षण यावरच जिद्दीने 1996 मध्ये भारतीय सैन्यदलात दाखल झालो असंख्य अडचणींवर मात करून सुभेदार मेजर पदापर्यंत पोहचलो.अनेक विद्यार्थी आज भारतीय सैन्यदलात विविध पदांवर कार्यरत आहेत. भारताच्या एअर डिफेन्स युनिट 28 चे नेतृत्व करताना अग्निवीर मधील जवानांना घेवून ऑपरेशन सिंधूर मध्ये अद्ययावत एअर डिफेन्स अवजारांवर पाकिस्तानचे 45 ड्रोन हवेतच उद्वस्त करण्याचा पराक्रम केला.असे सुभेदार सावंत म्हणाले.याबद्दल भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुभेदार मेजर संजय सावंत यांचा विशेष सन्मान केला. राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती आत्मसात करून देशरक्षणासाठी सेवा देण्याचे आवाहन केले.
आज सुभेदार मेजर संजय सावंत यांचेसारख्या ख-या हिरोचा सन्मान रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने केल्याबद्दल विशेष कौतुक कुडाळ तहसिलदार विरसिंग वसावे यांनी केले. संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ च्या प्राचार्य डाॅ स्मिता सुरवसे यांनी व्यक्त होताना आजचा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय आहे कारण भारतीय सैन्यदलातील डिफेन्स युनिट प्रमूख सुभेदार मेजर संजय सावंत यांचा सन्मान सोहळा संत राऊळ महाराज महाविद्यालयात होत आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन केले. कळसूलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडीचे फर्स्ट ऑफीसर गोपाळ गवस यांनी रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे आभार व्यक्त करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय छात्र सेना युनिटची सविस्तर माहिती दिली.राष्ट्रीय छात्र सेना युनिटची हक्काची जागा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध व्हावी अशी ईच्छा गवस यांनी व्यक्त केली.राष्ट्रीय छात्र सेना चळवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगल्या पध्दतीने सुरू असल्याचेही संत राऊळ महाराज महाविद्यालय चे कॅप्टन डाॅ एस.टी आवटे सर यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील भारत सरकार राष्ट्रीय छात्र सेना ARMY WING (स्थल सैनिक शिबिर) राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या कॅडेटसचा सन्मान करण्यात आला.यामध्ये सार्जंट अनंत चिंचकर (इ..9 वी कळसूलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी),सीपी एल संस्कार धुरी( इ.9 वी आंबोली पब्लिक स्कूल आंबोली), ज्युनियर अंडर ऑफीसर कुणाल वेंगुर्लेकर (एस के पाटील महाविद्यालय मालवण),एल पी सी एल सोहम राणे (कणकवली काॅलेज), सार्जंट क्षितीज चौकेकर (कणकवली काॅलेज),कॅडेट सायली वाघाटे (कणकवली काॅलेज),कॅडेट राहूल पवार (संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ),कॅडेट मयुरेश पुजारे (स.ह.केळकर महाविद्यालय देवगड),कॅडेट संभाजी माने (स.ह.केळकर महाविद्यालय देवगड),सिनिअर अंडर ऑफीसर राहुल चव्हाण (एस के पाटील महाविद्यालय मालवण), ज्युनियर अंडर ऑफीसर हर्षदा पवार (एस.के पाटील महाविद्यालय मालवण),सार्जंट रूपाली करंगुटकर (एस के पाटील महाविद्यालय मालवण) आदींना सन्मानपत्र देऊन सुभेदार मेजर संजय सावंत, कुडाळ तहसिलदार विरसिंग वसावे यांचेहस्ते सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या कॅडेटसच्या प्रशिक्षक शिक्षकांचाही सत्कार रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून करण्यात आला.यामध्ये फर्स्ट ऑफीसर गोपाळ भिवा गवस,(कळसूलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी ), श्री निखिल संजय तेली (आंबोली पब्लिक स्कूल आंबोली) ,लेप्टनंट डाॅ एम आर खोत, (एस के पाटील काॅलेज मालवण ), कॅप्टन डाॅ बाळू राठोड, (कणकवली काॅलेज कणकवली),कॅप्टन एस.टी आवटे, (श्री संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ) ,कॅप्टन सुनेत्रा ढेरे, (स.ह.केळकर काॅलेज देवगड)यांचा सन्मानपत्र देऊन सुभेदार मेजर संजय सावंत यांचेहस्ते सत्कार करण्यात आला.
सुभेदार मेजर संजय सावंत यांचे विचार हे युवा वर्गासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष राजीव पवार यांनी व्यक्त करताना सर्वांचे आभार व्यक्त केले.संपूर्ण कार्यक्रमचे सूत्रसंचालन असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने यांनी केले.