⚡सावंतवाडी ता.२४-: श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचा पाट या प्रशालेत रानभाजी पाककला स्पर्धा संपन्न झाली.
रानभाज्या या गुणधर्माने परिपूर्ण असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. रानभाज्यांच्या सेवनाने कितीतरी दुर्धर आजारांवर आपण मात करू शकतो. आणि याचेच महत्त्व आणि जनजागृती करण्याचे कार्य गेली कित्येक वर्ष प्रशालेत सुरू आहे.
रानभाजी पाककला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी रानभाज्यांपासून नाविन्यपूर्ण पाककृती बनवल्या होत्या. यामध्ये अळूवडी, मिक्स भाजी समोसे, शेवग्याच्या पानांचे सूप,शेवग्याच्या पानांचे घावणे, मोमोज, फोडीशीची भजी, घोटीच्या वेलीची भाजी, अळूच्या गाठी, टाकळ्याची भजी, कुर्डूवडी, दुदुर्ल्याची भाजी,पेवगा पराठा, इ. नानाविध पाककलांचे प्रदर्शन मांडण्यात आले.
या स्पर्धेमध्ये एकूण 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये कुमारी नेहा सतीश पालव(शेवग्याच्या पानांचे सूप )-प्रथम क्रमांक
कुमारी श्रावणी महेश सावंत( बांबूचे कटलेट)-द्वितीय क्रमांक
कुमारी वैदेही श्रीनिवास हडकर (शेवग्याच्या पानांची वडी )-तृतीय क्रमांक
कुमार श्रवण महेश सावंत( गोट्याच्या वेलीची वडी)- उत्तेजनार्थ असे अनुक्रमे क्रमांक काढण्यात आले.
या स्पर्धेसाठी सौ.सोनाली सचिन पाताडे (शाळा व्यवस्थापन समिती- अध्यक्षा) व सौ पूर्वा मंगेश पाटकर (शाळा व्यवस्थापन समिती -सदस्या )यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सहभागाबद्दल तसेच त्यांनी घेतलेली मेहनत याचे मान्यवर परीक्षकांनी भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रसाद कुबल यांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व पटवून सांगितले. रानभाज्या या पावसाळ्यात सहजरित्या प्राप्त होत असल्या तरी त्याचे जतन करणे हे महत्त्वाचे आहे. असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. प्रशालेतील शिक्षिका वेदिका दळवी व प्रतिभा केळूसकर तसेच माजी विद्यार्थी, पालक हे उपस्थित होते.