⚡सावंतवाडी ता.२४-: व्यक्तिमत्त्व घडवण्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला आवाज आणि देहबोली. अभिनयामध्येदेखील या बाबी फार महत्वाच्या असतात. याच विषयावर मूळ सावंतवाडीचे व सध्या मुंबईस्थित प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक-रंगकर्मी व आवाजतज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांचे ८ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य व्याख्यान बालरंग संस्था व मुक्ताई ॲकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २७ जुलैला सकाळी ९:३० ते दुपारी १:३० या वेळेत सावंतवाडीत खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत होणार आहे.
व्याख्यान विनामूल्य असून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.
श्रीनिवास नार्वेकर सुमारे ३४ वर्षे लेखन-दिग्दर्शन-अभिनय आणि प्रामुख्याने आवाज व देहबोली विषयावर काम करत आहेत. विविध संस्था, महाविद्यालये यामध्ये त्यांना या विषयावरील व्याख्यानांसाठी निमंत्रित केले जाते. मुंबई विद्यापीठाचा नाट्यविषयक पदव्युत्तर अभ्यासक्रम व अभिनयाच्या डिप्लोमा कोर्ससाठी निमंत्रित व्याख्याता म्हणून तसेच गोवा कला अकादमीच्या नाट्य विभागाचे सल्लागार म्हणून नार्वेकर यांनी काम पाहिले आहे.
लहान मुलांमध्ये पहिल्यापासून अभिनयाची आवड निर्माण होऊन त्यानिमित्ताने मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे, सार्वजनिक क्षेत्रात योग्य पद्धतीने बोलण्या-चालण्याचे नेमके प्रशिक्षण मिळणे, आपापल्या क्षेत्रात स्वतःला ठामपणाने सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी शिकणे महत्त्वाचे असते. आजच्या स्पर्धात्मक युगात या गोष्टींचे महत्व अधिक वाढलेले आहे. पण या गोष्टींकडे अनेक वेळा नीट लक्ष न दिल्यामुळे त्या आपल्या हातून हुकतात आणि विचार करेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. कसेही बोलले, कसेही उभे राहिले तरी चालते, हा ‘चलता है’ दृष्टिकोन कुठल्याच क्षेत्रात योग्य नाही. याकडे अभिनयाच्या माध्यमातून महत्व रुजवण्यासाठी हे विनामूल्य व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या विनामूल्य व्याख्यानाच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन लहान मुलांसाठी नाटक, अभिनय व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या “बालरंग”चे संचालक श्रीनिवास नार्वेकर आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी कौस्तुभ पेडणेकर, मोबाईल क्रमांक 8007382783 यावर संपर्क साधावा.