शिव चरित्रावर व्याख्यान तसेच दुर्ग संवर्धनावर चर्चासत्र:मोडीलिपी मार्गदर्शन आणि प्रदर्शनाचेही आयोजन..
⚡कुडाळ ता.२४-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाल्याबद्दल शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या वतीने शिव अभिमान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मराठा समाज सभागृह, कुडाळ येथे हा सोहळा होणार आहे. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यख्यान तसेच चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या शिव अभिमान सोहळयाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत करण्यात आला आहे.
हा आनंदाचा क्षण एकत्रितपणे साजरा करण्यासाठी या शिव अभिमान सोहळ्याचे आयोजन कुडाळ मध्ये करण्यात आले आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे ज्याची स्थापना लोकमान्य टिळकांनी १८९५ रोजी केली होती, ही ऐतिहासिक संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवप्रेमी तसेच दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था मार्फत हा शिव अभिमान सोहळा साजरा होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास हा प्रत्येक पिढीला प्रेरणादायकच आहे. लहानपणा पासून या शिवचरित्राचे धडे प्रत्येकाला दिले गेले तर त्या प्रत्येकामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते. शिवरायांचा हाच प्रेरणादायी इतिहास या कार्यक्रमातून एका व्याख्यानामधून सर्व शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर उलगडणार आहे. यासाठी येत्या २६ जुलै २०२५, शनिवारी सकाळी १० वा. कुडाळ येथील मराठा समाज हॉल, कुडाळ सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी शिवशंभू विचार मंच, महाराष्ट्र राज्याचे संयोजक सुधीर थोरात उपस्थित राहणार आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज- एक प्रेरणा स्त्रोत’ या व्याख्यानात शिवरायांचे जीवन चरित्र आणि त्यांची दुर्गसंपदा या विषयी मार्गदर्शन करणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे दुर्गविज्ञान हे स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये परमोच्च स्थानी होते, आज्ञापत्रात रामचंद्रपंत अमात्य उल्लेख करतात ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’. मराठा साम्राज्याची ओळख असणाऱ्या एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यामुळे आपल्या प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कोकणामधील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा समावेश झाला आहे.
कोकणामधील दुर्गसंवर्धन करणाऱ्या सर्व मंडळांचे एकत्रीकरण आणि या दुर्ग संवर्धनाच्या मोहिमांना एक ठोस दिशा तसेच शास्त्रीय माहिती देण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमात यासंबंधीचे सखोल मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या दुर्ग संवर्धन समितीचचे पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. सचिन जोशी खास मार्गदर्शन आणि चर्चासत्र घेणार आहेत. सिंधुदुर्ग आणि कोकण मधील दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व शिवशंभू विचारमंच यांच्या वतीने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच या निमित्ताने सिंधुदुर्ग आणि कुडाळ मधील मोडी लिपी चे खास प्रशिक्षण घेऊन परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या कुडाळ मधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. शिवाय प्रसिद्ध मोडी लिपी अभ्यासक श्री पंकज भोसले मोडी लिपी बाबतचे खास प्रदर्शन सुद्धा लावणार आहेत आणि मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. सिंधुदुर्गवासियांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग तसेच समस्त दुर्ग संवर्धक संस्थांकडून करण्यात आले आहे.