⚡मालवण ता.२३-:
इंग्रजी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असलेल्या ‘अँनेट असोसिएशन ऑफ इंग्लिश टीचर्स ऑफ इंडिया’ या संस्थेने नुकत्याच आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी परिषदेत मालवण तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, बिळवस येथील उपक्रमशील शिक्षिका अनुष्का नागेश कदम् यांच्या ‘शोध पेपर’ ला बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड म्हणून घोषित करण्यात आला.
सौ. कदम यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘रोल ऑफ रॅपर इन, इंग्लिश लँग्वेज डेव्हलपमेंट’ या विषयावर ‘अॅक्शन पेपर’ सादर केला होता. सौ. अनुष्का कदम यांनी त्यांच्या या शोधनिबंधात इंग्रजी भाषा शिकविण्यासाठी आणि तिचा विकास करण्यासाठी रॅपर किंवा रॅप म्युझिकचा कसा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो, यावर सखोल मांडणी केली होती. या परिषदेमध्ये देशभरातील उपक्रमशील अशा निवडक सुमारे ७० शिक्षकांनाच सहभागी होण्याची संधी मिळाली होती. या स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध करत सौ. अनुष्का कदम यांनी मालवणचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.
सौ. कदम यांच्या या यशाबद्दल बिळवस ग्रामसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव, सचिव अशोक पालव, प्रशालेचे मुख्याध्यापक जयवंत ठाकुर यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षणप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले.