⚡सिंधुदुर्गनगरी ता.२३-: महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०२३-२४ या वर्षासाठीचा प्रतिष्ठित कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार प्राप्त झाला आहे. कोकण विभागातून हा पुरस्कार मिळवून बँकेने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. सहकार क्षेत्रातील कै. वैकुंठभाई मेहता यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
हा पुरस्कार सोहळा बुधवार, २३ जुलै २०२५ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार राज्यमंत्री नामदार डॉ. श्री. पंकज भोयर आणि कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी, उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, संचालक सर्वश्री गणपत देसाई, रवींद्र मडगावकर, समीर सावंत, श्रीमती नीता राणे, श्रीमती प्रज्ञा ढवण, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मार्च २०२५ अखेर ६,००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा गाठला असून, आता ८,००० कोटी रुपयांच्या व्यवसायाच्या उद्दिष्टाकडे बँकेची वाटचाल सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला सहकाराची जोड देऊन बँक जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान देत आहे. व्यवसायाच्या या टप्प्यांसोबतच बँकेने आपले सामाजिक भान जपले असून विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. अशा नामांकित पुरस्कारांच्या माध्यमातून मिळणारी कौतुकाची थाप यशाची नवीन शिखरे पादाक्रांत करण्यासाठी ऊर्जा देणारी आहे.
बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. नितेशजी राणे साहेब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांनी अभिनंदन केले आहे.
जिल्हा बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे जिल्हावासियांच्या मनात विश्वासाचे नाते निर्माण झाले असून जिल्ह्याच्या विकासामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा मोलाचा वाटा आहे. बँकेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये बँकेच्या सभासद संस्था, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा वाटा आहे. यासोबतच बँकेचे कर्जदार, ठेवीदार आणि ग्राहकांचा बँकेवर असलेला अतूट विश्वास यामुळे बँकेची आर्थिक प्रगती नियमितपणे होत आहे. बँकेच्या पुढील वाटचालीमध्ये सर्वांचे असेच मोलाचे सहकार्य लाभेल, असा विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांनी व्यक्त केला