उद्योजक अजित राणे यांनी दिली व्हीलचेअर:कॉलेजचा राणे हॉस्पिटलसोबत आरोग्यसेवा करार..
कुडाळ : चालू शैक्षणिक वर्षांमध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालयाने एका विद्यार्थिनीसाठी पूर्ण वर्गाच्या सर्व तासिका तळमजल्यावर सुरू केल्या आहेत. दिव्यांग असल्यामुळे तिला मजले चढता येत नाहीत. अशा विद्यार्थिनीला शिक्षण घेण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये किंबहुना वरच्या मजल्यावर असणाऱ्या तासिका चुकू नयेत हा विचार करून सर्व तासिका तिच्यासाठी महाविद्यालयाने तळमजल्यावर एकाच वर्गात सुरु केल्या आहेत.
संत राऊळ महाराज महाविद्यालय होतकरू विद्यार्थ्यांच्या तसेच काही अध्ययनात अडचणी भासल्यास विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधून शिक्षणातील अडथळे दूर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योगपती अजित राणे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्हील चेअर दिलेली आहे. महाविद्यालयातील अशा काही दिव्यांग विद्यार्थ्यांना भविष्यातही उपयोग होऊ शकतो या हेतूने ही चाकाची खुर्ची त्यांनी दिलेली आहे. तसेच काही महत्त्वाच्या आरोग्यविषयक चाचण्या करून देण्यासाठी व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी उद्योजक अजित राणे यांचे बंधू डॉ.जी.टी.राणे यांच्या आरोग्य सेवेचाही लाभ होणार आहे.
महाविद्यालय आणि राणे हॉस्पिटल ॲन्ड मेडिकल रिसर्च सेंटर यांच्यामध्ये तसा सामंजस्य करार नुकताच करण्यात आलेला आहे. त्याचा फायदा भविष्यात विद्यार्थी व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांना होणार आहे . उद्योजक अजित राणे यांनी महाविद्यालयास सदिच्छा भेट देत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्यवाह महेंद्र गवस, सेवा निवृत्त सनदी अधिकारी सुहास पाटील आणि मधुसुदन मर्तल, प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे , प्रा. डॉ.अनंत लोखंडे, प्रा.प्रशांत केरवडेकर आदी उपस्थित होते.