संजय वेतुरेकर:सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव..
⚡कुडाळ ता.१८- : विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र वाचून प्रेरणा घ्यावी. व्यसनांपासून दूर राहून योग्य दिशा निवडून आत्मविश्वासाने वाटचाल केल्यास नक्कीच यश मिळते, असे प्रतिपादन शिक्षक नेते संजय वेतुरेकर यांनी केले. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीए जबक मालदार होते. व्यासपीठावर उद्योजक मुश्ताक शेख, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी राजू पठाण, मुफ्ती सर्फराज, सिराज शहा, अॅड. नाझनीन एजाज नाईक, मुख्याध्यापिका सौ. नसरीन डांगे, नझीर शेख आणि फाउंडेशनचे कार्यकारी संचालक एजाज नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना प्रशासकीय अधिकारी राजू पठाण यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडून जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश निश्चित असल्याचे सांगितले.
उद्योजक मुश्ताक शेख यांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शैक्षणिक मदत करण्याचे आवाहन केले.
मुफ्ती सर्फराज यांनी देशाच्या प्रगतीसाठी विद्यार्थी हा महत्वाचा घटक असून शिक्षणातूनच देश बलवान होतो, असे मत व्यक्त केले.
मुख्याध्यापिका सौ. डांगे यांनी सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांमध्ये अपार टॅलेंट असून त्यांना योग्य करिअर मार्गदर्शन मिळणे काळाची गरज असल्याचे सांगितले. नझीर शेख यांनी समाजातील शैक्षणिक मागासलेपणावर प्रकाश टाकत विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
प्रास्ताविक फाउंडेशनचे कार्यकारी संचालक एजाज नाईक यांनी केले. त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रमांचा आढावा घेतला. वर्षभरात विविध मस्जिद-मदरशांमध्ये घेतलेल्या रक्तदान शिबिरांचेही त्यांनी उल्लेख केला.
सीए झालेल्या विद्यार्थिनी जिया शेख हिने आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. संयोजनासाठी फाउंडेशनचे स्वयंसेवक हाफीज शेख, अय्याज दोस्ती, मुबीन दोस्ती, मेहबूब शेख, जमीर पटेल, इरबाज दोस्ती, अनीस दोस्ती, मकसूद खान, शाह हुसेन, नियाज शेख, फरहान मण्यार, कादर दोस्ती, परवेज नाईक, सादत नाईक, अनिक नाईक, अब्दूल हवालदार यांनी विशेष मेहनत घेतली.
