⚡बांदा ता.०९-: इन्सुली – कोठावळेवाडी येथील सोनाली प्रभाकर गावडे (२५) हिचा मृतदेह आज सकाळी शेळ जमिनीत पाण्यात तरंगताना आढळून आला. ती इन्सुली येथील साऊथ कोकण डिस्टलरीज कंपनीत कामाला होती. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी दिला.
सोनाली दररोज सकाळी पायवाटेने झाराप – पत्रादेवी बायपासवर येऊन कंपनीच्या गाडीने जायची. काल बुधवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे जेवणाचा डबा घेऊन पायवाटेने कामावर जायला निघाली. तर तिचे वडील शेर्ला येथे सॉ मिलवर कामावर जायला निघाले. मात्र, त्या दिवशी ती कामावर गेली नसल्याचे काल सायंकाळी स्पष्ट झाले. तीची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ती आढळून न आल्याने रात्री बांदा पोलिसात बेपत्ता फिर्याद देण्यात आली होती.
आज सकाळी पायवाटे लगतच्या शेळ जमिनीतील पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी शवविच्छेदन केले. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल त्यांनी पोलिसांना दिला. यावेळी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.