सरंबळ इंग्लिश स्कूलमध्ये 3 किलो वॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन…

कुडाळ : सरंबळ ग्रामस्थ समता संघ मुंबई या संस्थेच्या पुढाकाराने सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ येथे मंगळवारी ३ किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पासाठी दोन लाख रुपयांचा खर्च आला असून तो संस्था सदस्य, शाखा सदस्य, ग्रामस्थ बंधू-भगिनी व शालेय कर्मचाऱ्यांच्या देणगीतून उभारण्यात आला आहे.
या उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी सरचिटणीस राजेंद्र परब, सीईओ श्री. बालम सर, शाखाध्यक्ष जयप्रकाश गावडे, शाखाचिटणीस प्रसाद साटम, खजिनदार जयेंद्र तळेकर, सागर परब, मुख्याध्यापक अनिल होळकर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
शासनाचे वेतनेतर अनुदान बंद असल्यामुळे शाळेचा खर्च संस्थेला देणग्यांवरच चालवावा लागतो. संस्थेला दरवर्षी सुमारे ५० हजार रुपयांचे वीज बिल भरावे लागत असल्याने संस्थेने हा सौर प्रकल्प उभारून शाळेला मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. संस्था दरवर्षी विद्यार्थ्यांना दीडशे डझन वह्या, ५० दप्तरे तसेच दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलीचे मोफत वाटप करते. शाळेत ई-लैंग्वेज लॅब, इंटरॅक्टिव्ह बोर्ड व प्रोजेक्टरद्वारे आधुनिक शिक्षण दिले जाते. याशिवाय इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत मोफत भोजन दिले जाते.
प्रशालेमध्ये विविध उपक्रम उत्साहाने राबवले जातात व विद्यार्थी सहशालेय स्पर्धांमध्ये उत्तम यश मिळवतात. त्यामुळेच सन 2023-24 मध्ये प्रशालेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत तालुक्यातील पहिले पारितोषिक मिळवून तीन लाख रुपये रोख रक्कम जिंकली आहे. यापुढेही संस्थेतर्फे अनेक प्रकल्प शाळेत राबविण्यात येणार असल्याचे सरचिटणीस राजेंद्र परब यांनी यावेळी जाहीर केले.

You cannot copy content of this page