न्यायाधीश एस. डी. गुंडेवाडी..
⚡ओरोस ता ८-: बालकांचे संरक्षण हे केवळ कायद्याचे नव्हे, तर समाजाचेही नैतिक कर्तव्य आहे. पॉक्सो कायदा हा शिक्षेची भीती निर्माण करण्यासाठी नसून, प्रत्येक बालकाच्या सुरक्षिततेसाठी उभे करण्यात आलेले एक सक्षम कायदेपद्धतीचे उदाहरण आहे. पालक, शिक्षक, संस्था आणि विद्यार्थी यांनी याची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन न्यायाधीश सौ. एस. डी. गुंडेवाडी यांनी बोलताना केले.
५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्गच्यावतीने सुरू असलेल्या एनसीसी वार्षिक निवासी प्रशिक्षण शिबिरात ‘पॉक्सो कायदा व बालकांचे संरक्षण’ या विषयावर विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात न्यायाधीश सौ. एस. डी. गुंडेवाडी यांनी अध्यक्षस्थानी उपस्थित राहून आपले मौलिक विचार मांडले. तर प्रमुख वक्त्या म्हणून जिल्हा बालकल्याण समिती सदस्य ॲड. नम्रता नेवगी यांनी सखोल मार्गदर्शन केले. पाहुण्यांचे स्वागत असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट राज ताडेराव आणि सुभेदार मेजर सुधाकर कुलदीपकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख वक्त्या ॲड. नम्रता नेवगी यांनी पॉक्सो कायद्याच्या विविध तरतुदी स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना अत्यंत सुलभ भाषेत कायदाविषयक ज्ञान दिले. त्यांनी यामध्ये गुन्हे कोणते, त्यांची नोंद कशी होते, मुलांना मदत करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत, जबाबदारीची भूमिका कोण बजावते, हे उदाहरणांसहित स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, बालकांच्या सुरक्षेसाठी शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण शिबिरे यांमध्ये कायदाविषयी साक्षरता असणे अत्यंत आवश्यक आहे. पोक्सो कायदा हा केवळ शिक्षेपुरता मर्यादित नाही, तर तो एक सामाजिक बांधिलकीचा भाग आहे, असे सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी 58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज दिपकराव मंडलिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली बटालियनकडून शिबिरात प्रशिक्षणाबरोबरच समाजोपयोगी विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, जे एनसीसी कॅडेट्सच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत आहेत.
हा कार्यक्रम केवळ कायद्याविषयी माहिती देणारा नव्हता, तर एनसीसी कॅडेट्समध्ये नागरिक सजगता, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचे बीजारोपण करणारा ठरला. विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून मिळालेल्या माहितीचा उपयोग स्वतःच्या व इतरांच्या संरक्षणासाठी कसा करता येईल, हे निश्चित करण्यासाठी हा उपक्रम प्रबोधन आणि कृती यांचा उत्कृष्ट मिलाफ ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एनसीसी कॅडेट प्राची घाडीगावकर हिने तर पाहुण्याची ओळख कॅडेट अश्मी भोसले हिने केली. या कार्यक्रमास बटालियनचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मार्गदर्शक उपस्थित होते. यामध्ये असोसिएट एनसीसी ऑफिसर फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस, थर्ड ऑफिसर लत्ताराणी तावडे, सुभेदार ब्रिजेश सिंग, सुभेदार पुष्कर नेगी, नायब सुभेदार घनश्याम कुमार, सीएचएम राकेश पटेल, हवालदार प्रदीप पाटील, हवालदार दीपक कांबळे, हवालदार राकेश बनसोडे, तसेच जीसीआय एनी आणि जीसीआय सोनाली चेंदवणकर यांचा सहभाग होता.
फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: