किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचा पुढाकार:ब्रिगे सुधीर सावंत यांची माहिती..
ओरोस ता ८
नैसर्गिक शेती, फळ प्रक्रिया प्रशिक्षण, रोपवाटिका, कुक्कुटपालन याबाबत जिल्ह्यातील जनतेला प्रशिक्षित करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी ब्रिगे. सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या पत्रकार कक्षात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी प्रा विलास सावंत, शास्त्रज्ञ केशव देसाई, अब्दुल शेख आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या जीवनात भरभराट व आनंद प्राप्त होण्यासाठी मी समृद्ध व आनंदी गाव प्रकल्पाची स्थापना केली आहे. हा प्रकल्प विविध गावात राबविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून या गावांमध्ये नैसर्गिक शेती, भरडधान्य लागवड अभियान व वृक्ष लागवड अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, असेही यावेळी ब्रिगे सावंत यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना ब्रिगे सावंत यांनी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, युवकांना व महिलांना कृषी आधारित उद्योगांची कौशल्य शिकवण्यासाठी आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत असून कृषी क्षेत्राचा विकास होत आहे. ग्रामीण तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या संधी वाढवण्यासाठी नैसर्गिक शेती, फळ प्रक्रिया, कुक्कुटपालन व रोपवाटिका व्यवस्थापन या विषयाची 3 ते 7 दिवस कालावधीची प्रशिक्षणे किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे आयोजित केली जात आहेत.