समुद्रातील बेपत्ता मच्छिमाराच्या शोधासाठी ड्रोन कॅमेरा उपलब्ध करून द्यावा…

बाबी जोगी यांची मत्स्य विभागाकडे मागणी..

⚡मालवण ता.०८-:
मालवण शहरातील मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका वारा आणि लाटांच्या माऱ्यात पलटी होऊन एक मच्छिमार बेपत्ता झाला असून या बेपत्ता मच्छिमाराचा शोध घेण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाचा ड्रोन कॅमेरा उपलब्ध व्हावा व त्याद्वारे समुद्रात त्या बेपत्ता मच्छिमाराचा शोध घेण्यात यावा अशी मागणी मालवण मधील श्रमिक मच्छिमार संघांचे उपाध्यक्ष व मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त यांच्याकडे केली आहे. बेपत्ता मच्छिमाराच्या शोधासाठी ड्रोन कॅमेरा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्तानी दिल्याची माहिती जोगी यांनी दिली आहे

मालवण शहरातील मेढा येथील समुद्रात आज पहाटे मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका ही वारा आणि लाटांच्या माऱ्यात पलटी होऊन नौकेतील तीन मच्छिमार समुद्रात फेकले गेले. यातील कीर्तीदा लीलाधर तारी वं सचिन सुभाष केळुसकर हे दोघे मच्छिमार बचावले असून जितेश विजय वाघ हा मच्छिमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. स्थानिक मच्छिमारांकडून त्याचा समुद्रात शोध घेण्यात येत आहे. मात्र हवामानामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे याबाबत मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त यांचे लक्ष वेधले असून बेपत्ता मच्छिमाराच्या शोधासाठी मत्स्य विभागाची ड्रोन कॅमेरा यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच प्रसंगी कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर देखील उपलब्ध करून मिळावे अशी मागणी बाबी जोगी यांनी केली आहे. या दोन्ही मागण्यांबाबत सहाय्यक मत्स्य आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ड्रोन कॅमेरा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती जोगी यांनी दिली

You cannot copy content of this page