मालवण मेढा समुद्रात नौका पलटी ; दोन मच्छिमार बचावले, एक बेपत्ता…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण शहरातील मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका वारा आणि लाटांच्या माऱ्यात पलटी होऊन तीन मच्छीमार पाण्यात फेकले गेले. यात दोघेजण बचावले असून एक मच्छीमार बेपत्ता झाला आहे. स्थानिक मच्छिमारांकडून त्याचा समुद्रात शोध सुरू आहे. ही घटना आज पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालवण शहरातील मेढा जोशी वाडा येथील कीर्तीदा लीलाधर तारी (वय २९), सचिन सुभाष केळुसकर (वय-४२), जितेश विजय वाघ (वय ३५) हे तीन मच्छीमार आज सकाळी मेढा राजकोट येथील समुद्रात सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान छोट्या नौकेतून मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्रात जोराचा वारा व मोठ्या लाटांच्या तडाख्यात मासेमारी नौका पलटी झाली. यात तीनही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. या अपघातात कीर्तीदा तारी व सचिन केळुसकर हे सुखरूप किनाऱ्यावर पोहत पोहोचले. मात्र जितेश वाघ हा समुद्राच्या पाण्यात पडून बेपत्ता झाला आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस निरीक्षक मारुती जगताप, महादेव घागरे यांनी भेट देत माहिती घेतली. या अपघातातील मासेमारी बोट किनाऱ्यावर आणलेली असून बेपत्ता जितेश विजय वाघ याचा स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोध सुरू आहे.

You cannot copy content of this page