लोकप्रतिनिधींकडून संताप:सार्वजनिक बांधकामचा कारभार भोवला…
सावंतवाडी : जिल्ह्यातील संस्थानकालीन ऐतिहासिक वारसा असलेल्या सावंतवाडीतील जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. दगडी बांधकामावर सिमेंटच बांधकाम केल्यामुळे दगडी भिंती कमकुवत झाल्याचा आरोप होत असून याला सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.
यानिमित्ताने सार्वजनिक बांधकामचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ही भिंत कोसळल्याने कारागृहाच्या चारही बाजूंच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून येथील कैद्यांना आता ओरोस येथील कारागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी दिली आहे. दरम्यान, आजच्या घटनेत सुदैवाने कोणतीही मोठी हानी झालेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कव्हरेजसाठी पोहोचले असता कारागृह अधीक्षकांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले. कोसळलेली भिंत ही संस्थानकालीन होती. सुमारे २५० वर्षांचा इतिहास या इमारतीला आहे. ती पूर्णपणे दगडी बांधकामाची होती. मात्र, अलिकडच्या काळात या भिंतीवर चिरे व सिमेंटचे बांधकाम करण्यात आले होते. या सिमेंटच्या कामामुळेच मूळ दगडी भिंती कमकुवत झाल्या. आज अखेर ती कोसळली आहे. हेच काम याला कारणीभूत आहे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे कारागृहाच्या इतर भिंतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कैद्यांना ओरोस येथील सुरक्षित कारागृहात हलवण्याचे आदेश दिलेत. हा ऐतिहासिक ठेवा जमीनदोस्त झाल्याने स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी केलेल्या कामांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे केवळ कारागृहाची इमारत व इतर भागही धोक्यात आला आहे.
“जुन्या वास्तूंची काळजी घेत काम होण आवश्यक आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. कैद्यांची सुरक्षितता देखील घेतली पाहिजे. जिल्हा कारागृह ओरोसला बांधलेल आहे. त्यामुळे तिथे हे सर्व कैदी हलवावे अशी माझी सुरूवातीपासून मागणी आहे. मात्र, दोन्ही कारागृह वापरात आहे. कारागृहाची भिंत पुन्हा बांधण आवश्यक आहे. नवीन जेल वापरात आल असत तर जुन्या कारागृहाची देखभाल राखता आली असती.” – आम.दीपक केसरकर, माजी मंत्री
”ठेकेदाराच बोगस काम समोर आलं आहे. ‘मलिदा खाल्ला’ हे माझे आरोप खरे ठरले. सार्वजनिक बांधकाममुळे ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होत असून केवळ ठेकेदार, मिलिभगत असणाऱ्यांची पोट भरली जात आहेत. जनतेचा पैसा नको तिथं खर्च होतोय. विकासात्मक उद्देश अधिकारी, लोकप्रतिनिधींचा नाही. संबंधित ठेकेदारावर व जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी”
-रूपेश राऊळ, विधानसभा मतदारसंघ प्रमुख, उबाठा शिवसेना
“ही गंभीरबाब आहे.पालकमंत्री नितेश राणे यांनी यात लक्ष घालण आवश्यक आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू जतन करणं आवश्यक होतं. सार्वजनिक बांधकाम खात हे भ्रष्टाचाराच कुराण झालेलं आहे. मनमानी कारभार त्यांचा आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करून वाढिव बांधकाम केल असत तर ही वेळ आली नसती. हे न झाल्याने हा प्रकार आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे”
-बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष, सावंतवाडी
”कारागृहाची भिंत हे ऐतिहासिक स्मारक होत. त्याची जपणूक होण आवश्यक होतं. काळजी घेतली असती तर ही परिस्थिती आली नसती. या ऐतिहासिक गोष्टी फार कमी प्रमाणात आहे. भारतात इतर संस्थानात फार कमी प्रमाणात अशा वास्तू दिसतात”
-डॉ. जी.ए. बुवा, इतिहास अभ्यासक