सहाय्यक शिक्षक शिवाजी ठाकरे, पर्यवेक्षक सुनील कदम, प्रयोगशाळा परिचर विलास जाधव यांचा सेवानिवृत्त सत्कार..
⚡सावंतवाडी ता.०१-: मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव प्रशालेत प्रशालेचे सहाय्यक शिक्षक शिवाजी ठाकरे, पर्यवेक्षक सुनील कदम, प्रयोगशाळा परिचर विलास जाधव यांचा त्यांच्या कुटुंबियांसमवेत मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन प्रशालेच्यावतीने सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला.
मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेचे सहाय्यक शिक्षक शिवाजी पुंडलिक ठाकरे हे १९ वर्षांच्या सेवेनंतर आपल्या नियत वयोमानानुसार ३० एप्रिल रोजी, प्रशालेचे पर्यवेक्षक सुनील विष्णू कदम हे ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी तर प्रशालेचे प्रयोगशाळा परिचर विलास शिवराम जाधव हे ३१ वर्षांच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार काल ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्ताने संस्था व प्रशालेच्यावतीने वरील सर्वांच्या कार्याचा सेवागौरव समारंभ काल सोमवारी प्रशालेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे सचिव आर. आर. राऊळ, खजिनदार मोहन मुळीक, संचालक बाळकृष्ण तेंडोलकर, संचालक रामचंद्र केळुसकर, प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, माजी मुख्याध्यापक वैजनाथ देवण, श्रद्धा सावंत, बाळकृष्ण मुळीक, माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष शेखर पाडगावकर, केंद्रप्रमुख शिवाजी गावित, सत्कारमूर्ती शिवाजी ठाकरे, पर्यवेक्षक सुनील कदम, प्रयोगशाळा परिचर विलास जाधव, शिक्षक विठ्ठल सावंत, ओमप्रकाश तिवरेकर, प्रज्ञा मातोंडकर, संदीप कारिवडेकर, नेहा गोसावी, आनंदी मोर्ये, बी. बी. साव़त, पी. व्ही. केसरकर, सौ एस. एस. परुळकर, सौ. आर. आर. सावंत-भोसले, अभिजित गावडे, वैभव दगडखैर, रितेश राऊळ, ग्रंथपाल सतीश, रमेश भांडे, दाजी राऊळ आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे व सत्कारमूर्तींचे प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सत्काराबद्दल बोलताना ठाकरे सर म्हणाले, आपल्या वेळची कठीण परिस्थिती होती. मी माझे शिक्षण वसतीगृहात राहून पूर्ण केले, पण तुम्हाला सर्व घरून मिळत, त्यामुळे तुम्ही नशिबवान आहात, त्यामुळे सातत्यपूर्ण अभ्यास करा. जसा मी पर्यावरण प्रेमी झालो तसे तुम्ही शिक्षणप्रेमी, निसर्गप्रेमी, मानवप्रेमी काहीही व्हा, पण त्यासाठी शिक्षण घेताना शिक्षकांकडून जे शिक्षण मिळत ते मनापासून घ्या, असे सांगून आपल्या केलेल्या सत्काराबद्दल शाळेचे आभार व्यक्त केले.
यावेळी कदम सर यांनी आपल्या आजवरच्या शाळेतील ३८ वर्षांच्या प्रवासाबद्दल सांगताना शाळेने दिलेली कोणतीही जबाबदारी आपण कशी पूर्ण केली, याची माहिती दिली, तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, विद्यार्थी मित्रहो तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि अभ्यास करताना मोठ ध्येय समोर ठेवा. ते ध्येय साध्य करताना आपल्याजवळ चिकाटी, जिद्द, आव्हान हे गुण असणे गरजेचे आहे. हे गुण ज्या विद्यार्थ्यात असतील तो निश्चित आपल ध्येय साध्य करू शकतो, असे सांगून दहावीच्या विद्यार्थ्यांनी मला ९५ टक्के गुण मिळवायचेच आहेत हे ध्येय समोर ठेवून प्रयत्न करा नियोजन करा वेळापत्रक तयार करा तुम्हाला निश्चितच यश प्राप्त होईल. इतर वर्गातल्या मुलांनीही सातत्यपूर्ण अभ्यास करून आपल्या शाळेच नाव उज्ज्वल करा. आपली शाळा ही जिल्ह्यातील नावाजलेली शाळा आहे, तिचे नावलौकीक टिकविण्याची जबाबदारी जशी शिक्षकांची आहे, तशीच तुम्हा विद्यार्थ्यांची सुद्धा आहे, असे सांगुन आपल्या केलेल्या सन्मानाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
विलास जाधव म्हणाले, आपल्या शाळेतील शिक्षकांचा एकमेकांना मदत करणारा स्टाफ, सर्वात मिळुन मिसळून असणारा स्टाफ मला लाभला, हे माझे भाग्यच समजतो. आता मी या व्यवस्थेचा भाग नसणार आहे, याचे दुःख वाटते, पण नियत वयोमानानुसार सर्वांना निवृत्त व्हावे, लागते, असे सांगून शाळेच्यावतीने आपल्या केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक मारुती फाले यांनी तिन्ही सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव केला. यावेळी फाले म्हणाले, ठाकरे सर हे धुळे जिल्ह्यातील असूनही तिथला आहार वेगळा असूनही या वातावरणाशी चांगल्याप्रकारे जुळवून घेतलं. बांधावरची शेती, वृक्षारोपण असुदे ठाकरे सरांचे स्थान कायम अग्रस्थानी असे. ते नुसते वृक्षारोपण करून थांबत नसून रोपांची काळजी घेणे, पाणी देणे अशा कामात पुढे असत, याबरोबरच अध्यापन करताना मुलांमध्ये मिळून मिसळून जात असत. कदम सरांबद्दल सांगताना ते म्हणाले, कोणतेही काम उत्तमरित्या पार पाडण्यात कदम सरांचा हातखंडा होता, संस्थेने दिलेली पर्यवेक्षक पदाची जबाबदारीही उत्तमरित्या सांभाळली. विलास जाधव यांची जन्मभूमी कर्मभूमी मळगाव तसेच ते शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने शाळेबद्दल त्यांच्या मनात कायम आदर असे. प्रामाणिक काम आणि वरिष्ठांचा आदर हे त्यांचे विशेष गुण. प्रयोग शाळेतील स्वच्छता नीटनेटकेपणा, प्रयोग शाळेतील साहित्याची व्यवस्थित मांडणी करण्यात नेहमी जागरूक असत, असे सांगून तिन्ही सत्कारमूर्तींना व त्यांच्या कुटुंबियांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी तन्वी पारकर, अदिती राणे, काव्या पेडणेकर, नारायण मांजरेकर आदी विद्यार्थ्यांनीही तिन्ही सत्कारमूर्तींबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी संघातर्फे, तसेच विविध संघटनांतर्फे, माजी शिक्षक, माजी मुख्याध्यापकांच्यावतीने या तिन्ही सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ठाकरे यांनी ५० हजार रु. देणगी स्वरूपात तर १०० खुर्च्या वस्तू स्वरूपात शाळेसाठी भेट दिल्या. सुनील कदम यांनी २० खुर्च्या शाळेसाठी वस्तू स्वरूपात भेट दिल्या, तर विलास जाधव यांनी शाळेसाठी २५ हजारचा धनादेश मळगाव ऐक्यवर्धक संघाकडे तर ५ हजारचा धनादेश माजी विद्यार्थी परिवाराजवळ सुपूर्द केला. तसेच विलास जाधव यांनी वडील कै. शिवराम जाधव व आई कै. चंद्रभागा जाधव यांच्या स्मरणार्थ एसएससी परीक्षेत अनुसूचित जाती (sc) प्रवर्गातुन प्रशालेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रु. १० हजारचा धनादेश मुदत ठेव म्हणून संस्थेकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती फाले, सूत्रसंचालन प्रज्ञा मातोंडकर, तर आभार प्रदर्शन विठ्ठल सावंत यांनी केले