⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला-शिरोडा या सागरी महामार्गावरील मोचेमाड पुलाच्या संरक्षक कठड्याचा काही भाग कोसळल्याचे निदर्शनास आले आहे. या कोसळलेल्या भागामुळे त्याठिकाणी धोका निर्माण झाला आहे. तेथील रहदारी आणि एकंदर परिस्थिती विचारात घेता कोसळलेल्या कठड्याच्या भागाबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
वेंगुर्ला-शिरोडा या सागरी महामार्गावर असलेल्या मोचेमाड नदीवरून दोन्ही बाजूला जाण्यासाठी ब-याच वर्षांपूर्वी पूलाचे बांधकाम केले आहे. या पूलाच्या बांधकामामुळे येथील दळणवळणास चालना मिळाली असून जनतेच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. त्यामुळे व्यापारउदीम, पर्यटन तसेच आरोग्याच्या बाबतीत मोचेमाड पूल महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. दरम्यान, यंदाच्या पावसाळी हंगामात या पूलावर असलेल्या संरक्षक कठड्याचा काहीसा कोसळला आहे. तर संरक्षक कठड्याच्या उर्वरित भागावरील काँक्रिट पडून गेल्याने आतील लोखंडी सळ्या दिसू लागल्या आहेत. या पूलावरून निसर्गसौंदर्याचा आनंद लुटता येत असल्याने बरेच देशी विदेशी पर्यटकांना येथे थांबून सेल्फि घेण्याचा मोह आवरत नाही. तसेच पूलावरून खाडीतील मासेमारीही होत असल्याने स्थानिकांचा याठिकाणी राबता असतो. त्यामुळे भविष्यातील दूर्घटना टाळण्यासाठी कोसळलेल्या संरक्षक कठड्याबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी जनतेमधून होत आहे.
फोटोओळी – मोचेमाड पूलावरील संरक्षक कठड्याचा काही भाग कोसळला आहे.