⚡मालवण ता.०९-:
हाकेला धावणारी व नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक यात्रेला आज पहाटेपासून मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. श्री भराडी देवीची पूजाअर्चा झाल्यावर पहाटे साडे तीन वाजल्यापासून दर्शन व ओटी भरण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी भराडी देवीचे रूप वस्त्रालंकार व फुलांनी सजविण्यात आले होते. तर मंदिराचा गाभारा व सभामंडप आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. मंदिरावर तसेच मंदिर परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई पहाटेच्या वेळी सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडत होती. पहाटेच्या बोचऱ्या थंडीत देखील भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
भाविकांना सुलभ पद्धतीने दर्शन व्हावे यासाठी नऊ रांगांमधून दर्शनाची सोय करण्यात आली होती. सकाळच्या सत्रात भाविकांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. आज जत्रेदिवशीच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी असल्याने भाविकांची गर्दी सकाळच्या सत्रात कमी असेल असा बांधलेला कयास फोल ठरत सकाळच्या सत्रात सुद्धा भाविकांचा मोठा ओघ दर्शनासाठी लोटला होता. भाविकांच्या दर्शन रांगा दुरवर पसरलेल्या दिसत होत्या. महनीय व्यक्तिंच्या दर्शन रांगेत दिवसभर गर्दी दिसुन आली. भाविकाना आवश्यक सुचना देण्यासाठी बाबु आंगणे, बाळा आंगणे आदि मेहनत घेत होते. एस. टी. महामंडळाने आपल्या हंगामी अशा मसुरे, मालवण, कणकवली या तिन्ही स्टँड वरुन प्रवाशांना सुरळीत सेवा पुरवीली. तसेच गावागावातून खास यात्रा स्पेशल गाड्यांचे नियोजन केले होते.
दरवर्षी प्रमाणे अनेक राजकीय, शैक्षणिक, औद्योगीक, तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची भराडी देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडीत उपस्थिती दर्शवली होती. पालकमंत्री नीतेश राणे, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, खासदार अरविंद सावंत, खासदार संजय दीना पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, आमदार अनिल परब, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार वैभव नाईक, ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, हास्य जत्रा फेम अरुण कदम, उद्योजक डॉ. दीपक परब, सौ. राधिका परब, विशेष अधिकारी वर्षा झाल्टे, उद्योजक दीपक सावंत, गटविकास अधिकारी शाम चव्हाण तसेच यांच्यासह इतर राजकीय नेते व अधिकारी वर्गाने देवीचे दर्शन घेतले.
यात्रेचे चोख नियोजन – मंत्री आशिष शेलार
श्री भराडी देवीच्या दर्शनानंतर बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्राचे श्रद्धा स्थान असलेल्या श्री देवी भराडी मातेच्या दर्शनाने धन्य झालो. यात्रोत्सवाच्या निमित्ताने आंगणे कुटुंबियांच्या वतीने उभारण्यात आलेली व्यवस्था कौतुकास्पद अशीच आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आणि आंगणेवाडी भाविक याची मागणी नुसार प्रशासन यात्रेचे योग्य आणि चोख रितीने व्यवस्थापन केले आहे. देवी भराडी मातेच्या कृपेने महाराष्ट्रात सुखशांती लाभो अशी प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.
भराडीच्या दर्शनाने मन भरून आले – अनिल परब
यावेळी ठाकरे शिवसेना नेते आमदार अॅङ अनिल परब म्हणाले, प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या दर्शने मन भरून आले. देवीच्या दर्शनाने सुख आणि समाधान प्राप्त होते. यात्रेचे व्यवस्थापन उत्तम रीतीने झाले आहे. दर्शनाच्या रांगांची व्यवस्था उत्तम झाली असून भाविकांना देवीचे यथोचित दर्शन होत असल्याने समाधान व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.
