हा विजय माझ्या स्वाभिमानी जनतेचा..

अपक्ष उमेदवार रुपेश पावसकर यांचे भावनिक पत्र..

⚡कुडाळ ता.१०-: जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या राजकीय गुरूंचा पराभव करून नेरूर मधून विजयी झालेल्या अपक्ष उमेदवार रुपेश पावसकर आपल्या मतदारांचे आभार मानताना भावनिक झाले. त्यांनी मतदारांना लिहिलेल्या एका पत्राद्वारे आपला विजय सर्व मतदारांना समर्पित केला आहे. ​”शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवला आणि माझ्या कष्टाला आज माझ्या मायबाप जनतेने कौल दिला”, अशा शब्दात श्री. पावसकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात रुपेश पावसकर म्हणतात, मी जिल्हा परिषद सदस्य रुपेश अशोक पावसकर
सर्वाना ​नमस्कार, आजचा हा निकाल केवळ एका निवडणुकीचा निकाल नाही, तर तो सामान्य माणसाच्या शक्तीचा विजय आहे. माझ्यावर राहिलेली श्री देव कलेश्वर, माऊली, लक्ष्मीनारायण, सातेरी, प.पु. राऊळ महाराज यांची कृपा.
कोणत्याही मोठ्या राजकीय व्यक्तीचे पाठबळ पाठीशी नसताना, केवळ तुमच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या जोरावर मी आज जिल्हा परिषदेच्या उंबरठ्यावर पोहोचलो आहे.
​मी एकटा लढत नव्हतो, तर माझ्या पाठीशी प्रत्येक तो माणूस होता ज्याला विकासाची आस आहे. माझ्यावर प्रेम करणारे आणि माझ्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही सगळे असंख्य कार्यकर्ते यांचा मला सार्थ अभिमान आहे. मी सर्व मतदारांचा आयुष्यभर ऋणी राहीन. आपण दिलेला हा विश्वास असाच सार्थ करीन. प्रचाराच्या काळात तुम्ही दिलेला कपभर चहा असेल, पाठीवर मारलेली शाबासकीची थाप असेल किंवा ‘आम्ही तुझ्यासोबत आहोत’ हा दिलेला शब्द असेल… याच गोष्टींनी मला लढण्याचे बळ दिले.
​मी तुम्हाला शब्द देतो:
​अपक्ष आहे, पण हतबल नाही. पक्षाचे बंधन नसल्यामुळे माझा पहिला शब्द फक्त आणि फक्त माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी असेन.
​विकासाचा ध्यास, रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांसाठी मी अहोरात्र झटेन. ​कधीही उपलब्ध राहीन. विजयाचा गुलाल उतरला तरी, तुमच्या सुखा-दु:खात धावून येणारा तुमचा हक्काचा माणूस म्हणून मी कायम उपलब्ध असेन.
​तुमचा हा विश्वास मी सार्थ ठरवेन. हे पद माझे नाही, तर हे तुमच्या सेवेचे साधन आहे. पुन्हा एकदा मनाच्या तळापासून सर्वांचे खूप खूप आभार!
​आपला नम्र,
रुपेश अशोक पावसकर
नवनिर्वाचित सदस्य, जिल्हा परिषद.

You cannot copy content of this page