⚡मालवण ता.०१-:
कुडाळदेशकर गौडब्राह्मण सहयोग डोंबिवली यांच्यातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘शिक्षणतज्ज्ञ रामभाऊ परुळेकर स्मृती आणि मुख्याध्यापक बाबुराव परुळेकर स्मृती शैक्षणिक कार्य पुरस्कार २०२५’ मालवण एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह विजय प्रभाकर कामत यांना प्रदान करून गौरवण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने टोपीवाला हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहात एक भव्य अभिनंदन सोहळा पार पडला. हा सोहळा मालवण एज्युकेशन सोसायटी आणि टोपीवाला परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू यांनी विजय कामत यांच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून टोपीवाला हायस्कूलरुपी या ज्ञानवृक्षाचे परिपालन करण्याची मोठी जबाबदारी कामत सांभाळत आहेत. त्यांच्या अहर्निश सेवेमुळे गेल्या १०-१२ वर्षांत या ज्ञानवृक्षाच्या शाखांचा विस्तार झाला आहे आणि त्याला बहर आला आहे. त्यांच्या तन, मन आणि धनाच्या योगदानातूनच इथले प्रत्येक दृश्य समृद्ध झाले आहे. त्यामुळेच ते या शैक्षणिक कार्य पुरस्काराचे खऱ्या अर्थाने मानकरी ठरले आहेत.
ज्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. ते कै. रामभाऊ परुळेकर आणि कै. बाबुराव परुळेकर हे टोपीवाला हायस्कूलचे कर्तृत्ववान माजी मुख्याध्यापक होते. त्यांच्या समृद्ध इतिहासाची ओळख मालवण एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार दिगंबर सामंत यांनी करून दिली.
या सोहळ्यात मालवण एज्युकेशन सोसायटी आणि टोपीवाला परिवारातर्फे विजय कामत यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सौ. सुनीता कामत यांचाही साडी-ओटी भरून सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक श्री. वळंजू यांनी कामत यांना ‘कार्याग्रणी सन्मानपत्र’ प्रदान करून त्यांचा गौरव केला.
सूत्रसंचालन ज्योती तोरसकर यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन शिक्षक चंद्रशेखर बर्वे यांनी केले. देविदास वेरलकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मालवण एज्युकेशन सोसायटीच्या घुर्ये प्रि-प्रायमरी स्कूल, जयगणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा, अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कूल, ना. अ. देसाई टोपीवाला ज्युनियर कॉलेज आणि काळे आजींची बालवाडी अशा सर्व विभागांचे शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी आणि इतर स्टाफ उपस्थित होता. याशिवाय मालवण एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष शैलेश खांडाळेकर, सदस्य लक्ष्मीकांत खोबरेकर, टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते.